रुग्णसंख्या वाढताच, मृत्यूदराचा टक्का माघारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:14 AM2021-02-24T04:14:10+5:302021-02-24T04:14:10+5:30
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा ११ महिन्यानंतर मृत्यूदराचा आलेख माघारला आहे. आतापर्यंत हे प्रमाण दोन ते आठ टक्क्यांपर्यंत होते. ...
अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा ११ महिन्यानंतर मृत्यूदराचा आलेख माघारला आहे. आतापर्यंत हे प्रमाण दोन ते आठ टक्क्यांपर्यंत होते. आता १.५४ टक्क्यांवर आलेले आहे. चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हीचे सरासरी प्रमाण मात्र वाढतेच १४.२९ टक्क्यांवर पोहोचल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. हा रुग्ण ‘होमडेड’ होता. या महिन्यात जिल्ह्यात संक्रमितांचा मृत्यूदर राज्यात सर्वाधिक ६ ते ८ टक्क्यांपर्यत होता. त्यानंतर संशयित मृत व्यक्तीचे स्वॅब घेण्याऐवजी त्यांचे संपर्कातील हायरिस्कच्या व्यक्तीचे स्वॅब घेण्यात येऊ लागल्याने जिल्ह्याच्या मृत्यूदरात कमी आली. मात्र, संक्रमित रुग्णाचे तुलनेत मृत्यूदराचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यांपर्यंत होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट झाला असता मृत्यूचे प्रमाण २ ते ३ टक्क्यांपर्यंत होते. अलीकडे ४ फेब्रुवारीपर्यत जिल्ह्याचा मृत्यूदर हा २ टक्क्यांवर स्थिरावला होता.
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने संक्रमितांची संख्या वाढली. मात्र, कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा ग्राफ माघारला. सध्या हे प्रमाण १.५६ टक्क्यांपर्यंत कमी आलेले आहे. जिल्ह्यात संसर्गाच्या काळातील सर्वात कमी हे प्रमाण माघारले असल्याने दिलासा मिळाला असता तरी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती असल्याने जिल्ह्याच्या चिंतेत मात्र, भर पडली आहे.
बॉक्स
चाचण्यांचे प्रमाणात वाढ
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाणात आता वाढ झालेली आहे. आतापर्यंत उच्चांकी ३,२१७ चाचण्यांची नोंद याच आठवड्यात झालेली आहे. यापूर्वी ४०० ते ६०० पर्यंत असे चाचण्यांचे प्रमाण होते. संसर्ग वाढल्यानंतर हे प्रमाण दीड हजार चाचण्यांपर्यंत गेले. आता शासनाचा प्रशासनावर दबाव वाढल्याने हे प्रमाण ३ हजारांपर्यत पोहोचले आहे. यामध्ये पॉझिटिव्हीचे प्रमाण सध्या १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
बॉक्स
फेब्रुवारीमध्ये २२ दिवसांत ४७ मृत्यू
जिल्ह्यात पहिल्या संक्रमिताची नोंद ४ एप्रिल रोजी झाल्यानंतरच्या १ फेब्रुवारीपर्यंत ४१८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. मात्र, त्यानंतर फेब्रुवारी महिन्याच्या २२ दिवसांत तब्बल ४७ संक्रमितांचे मृत्यूची नोंद झालेली आहे. यामध्ये ३० ते ४० वयोगटातील पाच रुग्णांचा समावेश असल्याने चिंता वाढली आहे. अन्य मृतामध्ये ५० ते ७० वयोगटातील पुरुष-महिलांषा समावेश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.