धामणगावात वाढली बहिणींची संख्या
By admin | Published: November 13, 2015 12:28 AM2015-11-13T00:28:18+5:302015-11-13T00:28:18+5:30
‘गेली पुनवेची रात, आली भरात ग तीज, चंद्रमौळी झोपडीत माझ्या ओवाळते भाऊबीज’ या गीतासह शुक्रवारी आपल्या भावांना दीर्घायुष्य लाभो म्हणून प्रत्येक बहीण भावाला ओवाळणार आहे.
धामणगाव रेल्वे : ‘गेली पुनवेची रात, आली भरात ग तीज, चंद्रमौळी झोपडीत माझ्या ओवाळते भाऊबीज’ या गीतासह शुक्रवारी आपल्या भावांना दीर्घायुष्य लाभो म्हणून प्रत्येक बहीण भावाला ओवाळणार आहे. मागील दोन वर्षांचा विक्रम मुलींच्या जन्मदराने मोडला आहे़ शरद ऋुतूतील कार्तिक मासातील द्वितीया म्हणजे भाऊबीज. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखविणारा आहे़ बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन व्हावे, ही भाऊबिजेमागची भूमिका आहे़ ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजातील प्रत्येक महिलेचे सरंक्षण निर्भयपणे करू शकतील, तो दिवस म्हणजे भाऊबीजेचा. या दिवशी यम हा त्याची बहीण यमुनेच्या घरी जेवायला गेला होता. म्हणून या दिवसाला यम द्वितीया असेही म्हटले जाते़ या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे केले जाते, अशीही आख्यायिका आहे़ एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर चंद्राला भाऊ म्हणून ओवाळून भाऊबीज साजरी करतात़
भाऊ-बहिणीच्या अतूट स्नेहाचे प्रतिक असलेल्या भाऊबीज या सणासाठी आनंदाची बाब म्हणजे तालुक्यात मागिल तीन वर्ष मुलींच्या घसरलेल्या जन्मदाराचा टक्का या एका वर्षात दुप्पटीने वाढला आहे़ आज एक हजार मुलांमागे ९६८ हा मुलीचा जन्मदर ग्रामीण भागातील जनजागृती व आरोग्य विभागाच्या सतर्क तेमुळे वाढला आहे़
धामणगाव तालुक्यात मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, निंबोली, अंजनसिंंगी हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र येतात़ यात अठरा उपकेंद्र आहेत़ सन २०१४-१५मध्ये चार प्राथमिक आरोग्य केंद्रात २१७ मुलांनी व २९२ मुलींनी जन्म घेतला. विशेषत: ग्रामीण भागातील अठरा उपकेंद्रात ४७ मुलांनी तर ३५ मुलींनी या नव्या जगात प्रवेश घेतला़ ४९१ पैकी २६४ मुले व २२७ मुली यावर्षात जन्मल्या़ गर्भलिंग निदान प्रतिबंध कायदा, पहिल्या मुलाची आई असलेल्या दुबार गर्भवती महिलांकडे आरोग्यसेविकांच्यावतीने विशेष लक्ष देण्यात आले़ मुलापेक्षा मुलगी बरी, असा संदेश आरोग्य विभागाने घरोघरी पोहोचविला. त्याची फलश्रुती मुलींचा जन्मदर वाढविण्यात झाली.