नर्सरी, केजीचे २८ हजार चिमुकले यावर्षीही राहणार घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:37+5:302021-05-28T04:10:37+5:30
बच्चे कंपनीचा हिरमोड, अमरावती : कोरोना महामारीने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. याचा परिणाम लहानांपासून ते वृद्धांपर्यंत पाहायला मिळत ...
बच्चे कंपनीचा हिरमोड,
अमरावती : कोरोना महामारीने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. याचा परिणाम लहानांपासून ते वृद्धांपर्यंत पाहायला मिळत आहे. शिक्षण क्षेत्रातील प्री-प्रायमरी असलेल्या नर्सरी ते केजीचे चिमुकलेही यापासून सुटलेले नाहीत. नर्सरी व केजीमध्ये शिकत असलेले जिल्ह्यातील जवळपास २८ हजार विद्यार्थी यावर्षीही कोरोनामुळे घरातच राहणार काय, अशी चर्चा होत आहे.
आवडत्या सवंगड्यांसोबत आपल्याला पुन्हा खेळायला मिळणार की नाही. या भावनेने बच्चे कंपनीचाही हिरमोड होताना दिसून येत आहे. अमरावती जिल्ह्यात नर्सरी ते केजीच्या जवळपास १२३५ शाळा आहेत. या शाळांमधून २८ हजार ३४५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. नर्सरी ते केजी टू पर्यंतचे चिमुकले मागील वर्षी घरातच राहिले. यावर्षी कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे चिमुकले घरातच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नर्सरी ते केजी शाळा चालविणाऱ्या अनेक संस्थाचालकांमध्ये चिंतायुक्त वातावरण पसरले आहे. सर्वांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
कोट
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम, ही घ्या काळजी
दोन ते सहा वर्षे वयोगटातील मुले अनेकांचे अनुकरण करतात. शालेय शिक्षण बंद असल्याने त्यांच्या अनेक सवयित बदल जाणवतात. अशा वेळी पालकांनी त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी. घरातच असल्याने त्यांच्यात चिडचिडेपणा निर्माण होऊ शकतो. अशा वेळी पालकांनी त्यांच्यासोबत अधिक वेळ घालविण्याची गरज आहे. त्यांच्या गरजा वयोमानानुसार थोडेफार बदल होत असतात. त्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. आशिष साबू, मानसोपचार तज्ज्ञ, अमरावती
कोट
वर्षभर कुलूप यंदा काय होणार ?
गत वर्षभरापासून शाळा कुलूप बंद आहेत. बच्चे कंपनी शाळेत येत नसल्यामुळे शालेय शुल्कसुद्धा मिळाले नाही. शाळेचे मेंटेनन्स, शिक्षकांचे वेतन याशिवाय अनेक बाबींवर पैसा खर्च होत असतो. शाळेची देखरेख पैशांभावी रखडली आहे. कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला आहे.
- प्रशांत राठी, शाळाचालक, अमरावती
मागील मार्च महिन्यापासून नर्सरी केजीची शाळा बंद आहे. चिमुकले शाळेत आले नाहीत. ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहेत. मात्र, शाळा चालवायची कशी, असा प्रश्न आमच्यासमोर उपस्थित होत आहे. आता तर कोरोनाच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेमुळे आम्ही अधिकच संभ्रमात सापडलो आहोत.
- राहुल श्रृंगारे, शाळा संचालक, अमरावती
सव्वा वर्षापासून कोरोना महामारीमुळे शाळा बंदच आहेत. विद्यार्थी शाळेत येत नाहीत. आमच्या डोळ्यासमोर फक्त अंधार दिसत आहे. शाळा चालवायची की बंद करायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालकही आम्हाला जाब विचारतात. त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला देता येत नाही.
- वैष्णवी पवार, शाळा संचालक , अमरावती
कोट
पालकही त्रस्त
१. कोरोनामुळे विद्यार्थी घराबाहेर निघतच नाही. शाळा बंद असल्याने ऑनलाईन अभ्यासक्रमाचा आधार घ्यावा लागतो. मात्र, त्यांना मोबाईलचे व्यसन जडत आहे. त्यांच्या डोळ्यावर व आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- राधा मोखळे, पालक
२. आगामी काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत आपल्या पाल्यांना शाळेत कसे जाऊ देणार, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या आरोग्याची काळजी हीच प्राथमिकता आहे. मूल हे आमचे सर्वस्व आहे.
- मीरा शर्मा, पालक
बॉक्स पॉईंट
शहरातील नर्सरी टू केजीच्या शाळा
शाळांची संख्या विद्यार्थी संख्या
२०१८-१९ :११५८
विद्यार्थी संख्या : २६,०२३
२०१९-२० : १,१९८
विद्यार्थी संख्या : २७,०६७
२०२०-२१ : १,२३५
विद्यार्थी संख्या : २८,३४५