मान्सून सक्रिय होण्यास पोषक स्थिती
By admin | Published: June 27, 2017 12:00 AM2017-06-27T00:00:48+5:302017-06-27T00:00:48+5:30
विदर्भात मान्सून सक्रिय होण्यास पोषक स्थिती असल्याची सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे.
हवामानतज्ज्ञांची माहिती : शिवारात पेरण्यांची लगबग सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विदर्भात मान्सून सक्रिय होण्यास पोषक स्थिती असल्याची सुखद वार्ता हवामान विभागाने दिली आहे. येत्या ४८ तासांत जिल्ह्यासह विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तविली आहे. रविवारपासून ढगाळ वातावरण व हवेत गारवा असल्याने शेतशिवारांमध्ये पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे.
रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे खरीप पेरणीची मदार आर्द्रावर होती. परंतु या नक्षत्राच्या पाच दिवसांत पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र, दोन दिवसांपासून पुणे-मुंबईसह कोकणात पावसाने थैमान घातले असून मान्सूनची वाटचाल विदर्भाच्या दिशेने सुरू झाल्याची सुखद वार्ता हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. पश्चिम राजस्थान ते अंदमान दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र आणखी ठळक होण्याची शक्यता आहे. तसेच ९ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहात असून गुजरात किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती, राजस्थान तसेच दक्षिण गुजरातवर चार किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. मध्य भारत, गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत दक्षिण गुजरात, मुंबई, नाशिक, अकोला, नागपूर व पूर्व मध्य प्रदेशात मान्सून सक्रिय असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली. रविवारी पाऊस पडल्याने खोळंबलेल्या पेरण्यांनी वेग घेतला आहे. सात लाख हेक्टरमधील पेरण्या पावसाअभावी थबकल्या होत्या. आता मान्सूनला अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने पेरण्यांची लगबग सुरू झाली आहे. यापूर्वी पेरणी झालेल्या किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात मोड येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सद्यस्थितीत
७८ मिमी पाऊस
जिल्ह्यात एक ते २६ जून दरम्यान पावसाची १२६.५ मिमी. सरासरी अपेक्षित असताना सद्यस्थितीत ७८ मिमी पाऊस पडला तर वार्षिक सरासरीच्या एकूण ९.६ टक्के इतका हा पाऊस आहे. अमरावती ९३.८ मिमी, भातकुली ५७.८,नांदगाव खंडेश्वर ९०.८, चांदूररेल्वे ९१.८, धामणगाव रेल्वे ९०.५, तिवसा ७६, मोर्शी ७८.२,वरूड ६६.४, अचलपूर ६२.१, चांदूरबाजार ६५.९, दर्यापूर ७७.८, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७५.६,व चिखलदरा तालुक्यात १०५ मिमी पाऊस पडला आहे.