प्रेमविवाह न करण्याची शपथ देणाऱ्या प्राचार्यासह तिघांचे निलंबन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 06:35 PM2020-02-27T18:35:34+5:302020-02-27T18:52:10+5:30
विद्यार्थिनींना व्हॅलेंटाईन दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात ही शपथ देण्यात आली होती.
अमरावती - महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देणारे प्राचार्य आणि दोन प्राध्यापकांना विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी या संस्थेने गुरुवारी निलंबित केले. आर.एस. हावरे (प्राचार्य), पी.पी. दंदे (प्राध्यापक) आणि व्ही.डी. कापसे (प्राध्यापक) अशी निलंबित झालेल्यांची नावे आहेत.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना व्हॅलेंटाईन दिनाच्या आदल्या दिवशी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात ही शपथ देण्यात आली होती. यासंबंधी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, या शपथ देण्याच्या निर्णयावर टीकेची झोड उठली. मुलींनाच शपथ का, असा सवालही उपस्थित करण्यात आला.
'व्हॅलेंटाईन डे'च्या पूर्वसंध्येला तरुणाई गुलाबी रंगात रमली असताना, चांदूर रेल्वेच्या महिला कला, वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची सामूहिक शपथ घेतली होती. हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न करणार नाही आणि कुटुंबीयांनी हुंडा देऊन लग्न लावलेच तर भविष्यात सुनेसाठी हुंडा घेणार नाही, अशीही शपथ विद्यार्थिनींनी घेतली होती. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर टेम्भुर्णी गावात सुरू आहे. त्या शिबिरात ही शपथ घेण्यात आली होती. प्रदीप दंदे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामागे प्रेमातून सातत्याने होणाऱ्या हिंसक घटनांची पार्श्वभूमी आहे.
शपथ देण्यापूर्वी विद्यार्थांना ‘युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर दंदे यांनी मार्गदर्शन केले होते. तरुण विद्यार्थिनींवरील वाढत्या अत्याचाराचा विषय देखील त्यादरम्यान उलगडण्यात आला. त्यानंतर मुलींना ही शपथ देण्यात आली होती. यावेळी प्यारेलाल सूर्यवंशी, अशोक पळवेकर , राजेंद्र हावरे हे उपस्थित होते. शिबिरातील विद्यार्थिनी श्रेया वऱ्हेकर, भावना तायडे, मृणाल पाचखेडे, वैष्णवी गोखे, श्रेया जैन, अर्चना जैन, निशा नाईक, रुचिता रंगारी, पल्लवी सदबोरे, तेजस्वी बोबडे, भुवनेश्वरी देशमुख, अंकिता वानखडे, संगीता साऊतकर यांनीही विचार व्यक्त केले होते.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'
China Coronavirus : जगाला 'कोरोना'चा विळखा! आरोग्यमंत्र्यांनाच झाली लागण
Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'
Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी