ओबीसींना शिष्यवृत्ती, हीच ढोलेंना खरी श्रद्धांजली
By admin | Published: April 20, 2017 12:19 AM2017-04-20T00:19:20+5:302017-04-20T00:19:20+5:30
पांडुरंग ढोले यांनी दोन दशकांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी लढा उभारला होता.
सर्वपक्षीय शोकसभा : खा. तडस, आ.जगताप, अरूण अडसड, यशवंत शेरेकरांसह मान्यवरांची उपस्थिती
चांदूररेल्वे : पांडुरंग ढोले यांनी दोन दशकांपासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी लढा उभारला होता. आता ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळवून देणे, हिच पांडुरंग ढोलेंना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन सर्वपक्षीय शोकसभेच्या अध्यक्षपदावरून खा. रामदास तडस यांनी केले.
येथील जुन्या मोटर स्टँडवर डॉ.पांडुरंग ढोलेंच्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. ढोले यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता राष्ट्रीय जनता दलाचे सरचिटणीस कुंवर दानिश अली प्रामुख्याने उपस्थित होते. ५ एप्रिल रोजी राज्य जनता दलाची सभा डॉ. पांडुरंग ढोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. शेतकरी-शेतमजुरांसाठी जो लढा जनता दलातर्फे राज्यात उभारला जाणार होता, त्याची माहिती ढोलेंनी दिली होती. त्यांचे कार्य जनता दल पुढे नेईल, असे मत कुंवर दानिश अली यांनी व्यक्त केले. मी या मतदारसंघातून निवडून येऊन मंत्री झालोे. याचे सर्व श्रेय पांडुरंग ढोले यांचे होते, असे माजी मंत्री यशवंत शेरेकर यांनी म्हटले. ढोलेंनी मालखेड पर्यटन स्थळ, आयटीआय, तंत्रनिकेतन आदींसाठी प्रयत्न करून चांदूररेल्वेचे वैभव वाढविल्याचा उच्चारही त्यांनी केला. ढोले यांचेशी कौटुंबिक संबंध होते. संघात ते माझ्यसोबत होते. त्यांची मदत आजही विसरलो नाही, असे माजी आमदार अरुण अडसड म्हणाले.
ओबीसी वर्गासाठी संघर्षयात्रा, शिष्यवृत्ती, विदर्भ एक्स्प्रेसचा थांबा आदी आंदोलनांमुळे पांडुरंग ढोले हे तालुक्यातच नव्हे तर राज्यातील विरोधी पक्षांमध्येही ओळखले जात होते. कोणत्याही मागण्या शासन दरबारी मंजूर करून आणण्यात त्यांचा हातखंडा होता, असे प्रतिपादन आ.वीरेंद्र जगताप यांनी केले. जगताप यावेळी म्हणाले की, साधेसुधे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी अल्पसंख्यक, दलितांसाठी ओबीसी वॉर्डात आपली राजकीय वेगळी ओळख केली. त्याचा वारसा त्यांचे पूत्र क्रांतीसागर ढोले यांनी चालवावा, असेही ते म्हणाले.
जनता दलाचे माजी आ. शरद पाटील राज्य महिला जनता दलाच्या अध्यक्ष मानकर, पीरिपाचे चरणदास इंगोले, माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, झाडे गुरूजी, देवीदास राऊत, विनोद जोशी, अभिजीत ढेपे, सिटू सूर्यवंशी, वाघ, मधुकर सव्वालाखे, संजय आसोले आदींनी श्रद्धांजली वाहिली. शोकसभेचे सूत्रसंचालन विलास काळे यांनी तर आभार प्रदर्शन संजय डगवानी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)