सेवानिवृत्तांची शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अडवणूक, लाभ देण्यास टाळाटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:14 AM2021-09-23T04:14:40+5:302021-09-23T04:14:40+5:30
परतवाडा : सेवानिवृत्तांची शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अडवणूक केली जात आहे. सेवानिवृत्तीचे लाभ देण्यास टाळाटाळ होत आहे. याबाबत न्यायालयात दाद मागावी ...
परतवाडा : सेवानिवृत्तांची शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अडवणूक केली जात आहे. सेवानिवृत्तीचे लाभ देण्यास टाळाटाळ होत आहे. याबाबत न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचा इशारा संबंधितांना देण्यात आला आहे. सेवानिवृत्तीनंतर आपली पेन्शन केस मार्गी लागावी म्हणून संबंधित सेवानिवृत्त कर्मचारी, मुख्याध्यापक आणि शिक्षकांना वारंवार त्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. तासनतास संबंधितांची वाट बघत बसावे लागत आहे. या अनुषंगाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून सेवानिवृत्त मंडळी थकून गेली आहे.
सेवानिवृत्तिचे लाभ नाही
मेळघाटातील हरिसाल येथील श्रीराम विद्यालयातून दिलीप भोंगाडे हे कनिष्ठ लिपिक पदावरून ३१ डिसेंबर २०२० ला सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपले सेवानिवृत्ती प्रकरण २४ सप्टेंबर २०२० ला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाकडे सादर केले. महालेखाकार, नागपूर यांच्या कार्यालयाकडून त्यांचे पेन्शन प्रकरण ४ ऑगस्ट २०२१ ला मंजूर करण्यात आले. पण, त्यांना ग्रॅज्युइटीसह निवृत्ती वेतनाचा लाभ अद्याप मिळालेला नाही.
----------------
न्यायालयात दाद मागणार
सेवानिवृत्तीनंतर शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून निवृत्तीचे लाभ मिळवण्यास विलंब होत असल्याने दिलीप भोंगाडे यांनी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडे अनेकदा पत्रव्यवहार केला. त्यांनी शिक्षण मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. सर्व लाभाच्या रकमेची सव्याज भरपाई न मिळाल्यास न्यायालयात दाद मागावी लागणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.