हुक्का पार्लरवर धाड, मालूपुत्र वरुणवर गुन्हा

By admin | Published: May 10, 2017 12:03 AM2017-05-10T00:03:59+5:302017-05-10T00:03:59+5:30

रेल्वेस्थानक ते बसस्थानक मार्गावरील "अड्डा २७" या हुक्का पार्लरवर सोमवारी पोलिसांनी धाड टाकली.

Offense on Hukka Parlor, Manuputra Varun | हुक्का पार्लरवर धाड, मालूपुत्र वरुणवर गुन्हा

हुक्का पार्लरवर धाड, मालूपुत्र वरुणवर गुन्हा

Next

बजरंग दल : शनिवार, रविवारी डान्सबारही
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वेस्थानक ते बसस्थानक मार्गावरील "अड्डा २७" या हुक्का पार्लरवर सोमवारी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला प्रवीण मालू यांचा पुत्र वरूण याने शिवीगाळ करीत धमकावल्याच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हे नोंदविले. या हुक्का पार्लरमध्ये वरूण प्रवीण मालू याच्यासह एकूण पाच भागिदार असल्याचा आरोपही बजरंग दलाचे महानगर संयोजक निरंजन दुबे यांनी केला आहे.
पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री ‘बॉम्बे स्ट्रीट कॅफे’च्या वरील माळ्यावर असलेल्या ‘अड्डा २७" या हुक्का पार्लरवर धाड टाकल्याने शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी हुक्का पार्लरची पाहणी करून परवान्याची तपासणी केली. यावेळी येथे अनेक तरूण-तरूणी हुक्क्याचे ‘कश’ घेताना आढळून आलेत. पोलिसांनी या तरूण-तरूणींचे बयाण नोंदविले असून परवान्याची सत्यता पडताळणी सुरु केली आहे. या हुक्का पार्लरचे धागेदोरे विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेला खासगी कोचिंग क्लासेस चालविणारा शिक्षक मनोज पांडे याच्या रासलीलेशी जुळले असण्याची शक्यता पोलिस वर्तुळात चर्चेचा मुद्दा ठरला आहे. हुक्का पार्लरच्या आडून येथे काही गैरप्रकार सुरु असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धाड टाकली असल्याचा मुद्दा म्हणूनच ऐरणीवर आला आहे.
विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांच्याशी बळजोरीने संबंध ठेवणे, त्याचे व्हिडिओ क्लिप तयार करणे आणि त्याआधारे मुलींचा वारंवार वापर करणे, अशी पद्धती मनोज पांडे अवलंबित होता.

मुले-मुली ओढतात हुक्का
अमरावती : मनोजच्या कार्यपद्धतीत हुक्का पार्लरमधील विद्यार्थिनींशी सहवास, हा मुद्दाही समाविष्ट असल्याची माहिती बाहेर आली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी सदर हुक्का पार्लरवर छापेमारी केल्याची माहिती आहे.
बजरंग दलाला धमक्या
पोलिसांच्या धाडीनंतर बजरंग दलाचे निरंजन दुबे हे काही वेळातच हुक्का पार्लरमध्ये पोहोचले. हुक्का पार्लरमध्ये आक्षेपार्ह कृत्ये चालत असल्याची माहिती दुबे यांनाही असल्यामुळे ते तेथे पोहोचले. निरंजन दुबे यांना पाहून हुक्का पार्लरच्या भागिदारांचे धाबे दणाणले. हॉटेल मालक प्रवीण मालू यांचा पुत्र वरूण याने निरंजन दुबे यांना ‘तु कशाला आला’, असा जाब विचारुन शिवीगाळ केली व जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार दुबे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी वरुण मालूविरूद्ध भादंविच्या कलम ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला समज दिली आहे.
हुक्का पार्लरमध्ये ३०० ते १ हजारापर्यंतच्या ४० चवींमध्ये हुक्का उपलब्ध आहे. मुले-मुली एकत्र बसून येथे हुक्का ओढतात आणि मुखातून धुराचे लोळ हवेत सोडतात. हा हुक्का तयार करण्यासाठी मुंबईचा जाणकार तरुण मुद्दामच आणण्यात आला आहे.

‘साऊन्ड पु्रफ’
सदर पार्लरला जाण्यासाठी तयार करण्यात आलेला रस्ता देखील भुलविणाराच आहे. पार्लरसाठी स्वतंत्र जीना तयार करण्यात आला आहे. चार जण जाऊ शकतील, अशा छोट्या उदवाहिनी (लिफ्ट)ची व्यवस्था करण्यात आली आहे. पार्लरच्या अगदी प्रवेशद्वारासमोर या लिफ्टचे दार उघडते. पार्लरच्या दाराबाहेर ‘स्मोकिंग झोन’चा बोर्ड लावण्यात आला आहे. हुक्का पार्लर तिसऱ्या माळ्यावर असले तरी खाली मुख्य रस्त्यावर कर्मचारी तैनात असतात. तरुण-तरुणींना ते ‘मार्ग’दर्शन करतात. फोमच्या आवरणाने द्वारव्यवस्था ‘साऊन्ड पु्रफ’ करण्यात आली आहे. आत डिजेवर ठेका धरला जात असताना बाहेर त्याचा आवाज येऊ नये, त्यासाठी ही सोय करण्यात आली आहे.

हुक्का पार्लर नव्हे, डान्स बार
पोलिसांनी नियोजित धाडसत्र राबविल्याचा आरोप दुबे यांनी केला. धाड टाकण्यापूर्वीच पोलिसांनी मालू यांना सूचना दिल्याने पोलीस पोहोचण्यापूर्वीच हुक्का पार्लरमधील सर्व व्यवस्था सुधारण्यात आली होती, असा आरोप दुबे यांनी केला आहे. हुक्क्यातील मादक पदार्थांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी एफडीएची मदत घेतली नाही. शनिवारी व रविवारी हे हुक्का पार्लर ‘डान्स बार’मध्ये रूपांतरित होते. पोलिसांना कल्पना असूनही मुद्दामच हे दोन दिवस वगळून धाड टाकल्याचा आरोप दुबे यांनी केला आहे.

सशस्त्र हल्ल्याची तयारी
हुक्का पार्लरवर टाकलेल्या धाडीत पोलिसांना काही सापडले नाही. दरम्यान निरंजन दुबे हुक्का पार्लरमध्ये पोहोचले. यावेळी हुक्का पार्लरमध्ये कार्यरत कर्मचारी हॉकी स्टिक व स्टंपद्वारे सशस्त्र हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप दुबे यांनी केला. मात्र, पोलिसांचा ‘वॉच’ असल्यामुळे ते हल्ला करू शकले नाहीत, असे दुबे यांचे म्हणणे आहे.

पोलिस आयुक्तांनी हुक्का पार्लर तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
- प्रमेश आत्राम, पोलीस निरीक्षक

Web Title: Offense on Hukka Parlor, Manuputra Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.