वकिलाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा; बार असोसिएशन आक्रमक
By प्रदीप भाकरे | Published: March 18, 2024 07:33 PM2024-03-18T19:33:31+5:302024-03-18T19:33:47+5:30
पोलीस आयुक्तालयावर धडक; गुन्ह्यातून नाव कमी करण्याची मागणी.
अमरावती : मृत व्यक्तीच्या नावावर तोतया उभा करून मासोद येथील जमीन व्यवहाराप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात ॲड. वासुसेन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याविरोधात अमरावती जिल्हा वकील संघ चांगलाच आक्रमक झाला आहे. याविरोधात वकील संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी १८ मार्च रोजी पोलीस आयुक्तालयावर धडक दिली. आयुक्तालयाच्या पायऱ्यांवर धरणे दिली. या गुन्ह्यातून ॲड. वासुसेन देशमुख यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी वकील संघाच्या वतीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनानुसार, ॲड. वासुसेन देशमुख यांच्याकडे एका पक्षकाराने मोहम्मद इकबाल भुरे खान यांच्यासोबत झालेल्या व्यवहाराची टोकन चिठ्ठी दाखवून आपल्याला या शेताचा व्यवहार करावयाचा आहे, असे सांगितले. त्यावर ॲड. देशमुख यांनी पक्षकारास जाहीर नोटीस प्रकाशित करण्यास सूचविले. जाहीर नोटीस प्रकाशित झाल्यावर त्यांच्याकडे आलेल्या हरकतीवरून मोहम्मद इकबाल भुरे खान हे मय्यत झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर १५ मार्च रोजी अज्ञात व्यक्तींनी मृतक मोहम्मद इकबाल भुरे खान यांच्या नावाने खोट्या दस्तऐवजाच्या आधारावर शेताची खरेदी सहनिबंधक यांच्याकडे लावली. ही बाब मोहम्मद इकबाल भुरे खान यांचे जावई तौसिफ काजी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी खरेदीचा व्यवहार थांबविला. या प्रकरणात संबंधित आरोपींसोबतच ॲड. वासुसेन देशमुख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. यातील दहा आरोपींना अटक देखील करण्यात आली.
...तर आंदोलन अधिक आक्रमक करू
वास्तविक पाहता या प्रकरणात ॲड. वासुसेन देशमुख यांची भूमिका फक्त पक्षकाराचे वकील म्हणून जाहीर नोटीस देण्यापर्यंतच होती. मात्र, त्यानंतरही पोलिसांनी शहानिशा न करता ॲड. देशमुख यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल. त्यामुळे या गुन्ह्यातून त्यांचे नाव कमी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी वकील संघाचे अध्यक्ष शिरीष जाखड, सचिव उमेश इंगळे, उपाध्यक्ष नीता तिखिले, ग्रंथालय सचिव अभिषेक निस्ताने, कार्यकारी सदस्य रसिका उके, सुदर्शन पिंपळगावकर, पीयूष डाहाके, पंकज यादगीरे, कुशल करवा, किरण यावले, भूमिका वानखडे, चंद्रशेखर डोरले यांच्यासह अन्य उपस्थित होते.