‘त्या’ आलमारीतील आक्षेपार्ह साहित्य गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 11:01 PM2018-06-20T23:01:08+5:302018-06-20T23:01:46+5:30
जादूटोणाविरोधी कायदा अंमलात असतानाही राजरोस भोंदूगिरी करणाऱ्या पवन महाराजला मार्च महिन्यापासून अभय देत आलेले गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी आता त्याच्या घरच्या कपाटातील आक्षेपार्ह साहित्य रफादफा करण्याची संधी दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जादूटोणाविरोधी कायदा अंमलात असतानाही राजरोस भोंदूगिरी करणाऱ्या पवन महाराजला मार्च महिन्यापासून अभय देत आलेले गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी आता त्याच्या घरच्या कपाटातील आक्षेपार्ह साहित्य रफादफा करण्याची संधी दिल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.
कर्मकांड, अंधश्रद्धेला मूठमाती देण्यासाठी अवघ्या जगाला मार्गदर्शन करणाºया कर्मयोगी गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा हा जिल्हा. गाडगेबाबांच्या समाधीपासून गाडगेनगर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना, तेथील अंमलदार अंधश्रद्धेला बळकटी देत होते, असे एकंदर चित्र पुढे आले आहे. या गंभीर प्रकरणात पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक काय भूमिका घेतात, हा मुद्दा आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
काय घडले?
भोंदू पवन महाराजच्या आई-वडिलांना अटक केल्यानंतर एक तरुण परित्यक्त्या पवनच्या घरी गेली. दोन पिशव्या भरून काही साहित्य ती घेऊन गेली. ते साहित्य अलमारीतील असल्याचे निरीक्षण वसाहतीतील लोकांनी नोंदविले आहे. शासकीय वसाहतीत काही मंडळी या घटनेची साक्षीदार आहेत.
शासकीय वसाहतीतील लोकांनी पवनच्या भोंदूपणाची, त्याच्याकडून मिळणाºया जारण-मरणाच्या धमक्यांची, दहशतीची पहिली तक्रार २१ मार्च २०१८ गाडगेनगरच्या वरिष्ठ निरीक्षकांच्या नावे दिली. पवनचा दरबार आणि हा प्रकार सहन न झालेल्या सुजाण नागरिकांना करणी करण्याच्या धमक्या त्यानंतरही सुरूच राहिल्या. त्रस्त लोकांनी यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे (अंनिस) धाव घेतली. अंनिसचे जिल्हा सचिव हरीश केदार यांनी १६ मे २०१८ रोजी ठाणेदार मनीष ठाकरे यांना भेटून तक्रार दिली. इत्थंभूत प्रकार त्यांना कथन केला. कायदाही समजवून सांगितला. ठाकरे यांनी त्याच दिवशी पवन घोंगडेविरुद्ध गुन्हा नोंदविला खरा; परंतु पवनला अटक केली नाही. त्याच्या घरातील साहित्याची जप्तीही केली नाही. चार-दोन दिवसांच्या शांतीनंतर पवनचा दरबार पुन्हा जोमाने भरला. अधिक मासात तो बहरला. पोलीसही काही बिघडवू शकत नाही, अशा धमक्या, मूठ मारण्याच्या धमक्या वसाहतीतील लोकांना सुरूच राहिल्या. भोंदू पवनला आवरा, अटक करा, ही आर्जव घेऊन अंनिसचे हरीश केदार ठाणेदारांना सतत भेटत राहिले; परंतु ठाकरे यांनी काहीच केले नाही. अमरावतीत कायद्याचे राज्य आहे काय, असा प्रश्न पडलेल्या नागरिकांनी अखेर १४ जून रोजी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांची भेट घेतली. आपबीती सांगितली. आयुक्तांनी विषयाचे गांभीर्य ओळखून ठाणेदारांची कानउघाडणी केल्यामुळे ठाणेदार ठाकरे हलले. परंतु, आरोपीला पाठीशी घालण्याची त्यांची कार्यशैली कायमच राहिली.
पवनच्या घरी गाडगेनगर पोलिसांनी प्रथम थातूरमातूर जप्ती केली. भ्रामक जादूटोण्याचा पुरावा सांगणाºया दोलक, मोरपिसाचा झाडू या वस्तू जप्त केल्या नाहीत. ओसरीतील संदूक तपासला नाही. मोठी आलमारी उघडली नाही. कुजबुज झाल्यावर ठाणेदार ठाकरे उशिरा रात्री स्वत: पुन्हा जप्तीसाठी गेलेत. दोलक, मोरपिसाचा झाडू जप्त केला; संदूक आणि कपाट मात्र सोडून दिले. कपाटाच्या चाव्या परगावी असल्याच्या आरोपीच्या आईच्या विधानावर त्यांनी आश्चर्यकारकरीत्या विश्वास ठेवला. सीपींचा आदेश असताना कपाट सील करणे वा बनावट चावीने ते उघडून घेणे त्यांनी महत्त्वाचे समजले नाही. दोन दिवसांनी त्यांनी ते कपाट उघडले. परंतु, १४ च्या रात्री आणि १५ रोजी 'त्या' महिलेने कपाटातील साहित्य गायब केल्याचा आरोप आता मूळ तक्रारकर्ता रवींद्र श्रुंगारे यांनी केला आहे. श्रुंगारे यांच्यावर पोलिसांकडून दबाव येत असल्याची, अटकेचीही धमकी दिली जात असल्याची विश्वसनीय माहिती आहे. एकूणच या प्रकरणाला संशयाचे नाना कंगोरे आहेत. पोलीस आयुक्तांनी निष्पक्ष कारवाई करून पारदर्शक आणि लोकाभिमुख पोलिसिंगचा प्रत्यय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
'ती' तरुण परित्यक्त्या पवन महाराजच्या सर्वात जवळची
पवन महाराजचे बहुतांश ‘भक्त’ लब्धप्रतिष्ठित आहेत. त्यांच्या चारचाकी वाहनांची पवन महाराजच्या घरासमोर रीघच लागायची. अशातच एक तरुण परित्यक्ता पवन महाराजची सर्वात आवडती भक्त बनली. पवन महाराजची सेवा करण्यासाठी 'ती' तरुणी दररोज त्याच्या घरी यायची. एकदा मध्यरात्री २ वाजता ती पवन महाराजची नळावर आंघोळ घालून देत असल्याचेही दृश्य शेजाऱ्यांनी पाहिले. अनेकदा ती महिला पवन महाराजकडे मुक्कामी असल्याचेही परिसरातील नागरिक सांगतात.
पोलीस आयुक्त कारवाई करणार का?
तीन वर्षांपासून सुरू असलेल्या पवन महाराजच्या भोंदूगिरीला शेजारी वैतागले होते. नागरिकांनी मार्च महिन्यात गाडगेनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीची दखलच घेतली गेली नाही. नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे दाद मागितली. अंनिसचे जिल्हा सचिव हरीश केदार यांनी पवन महाराजची भोंदूगिरी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर १६ मे रोजी सर्व पुराव्यांसह गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी गुन्हा नोंदविला; पण पवनला अटक केली नाही. त्यानंतरही पवनचा दरबार काही दिवस सुरू होता. महिना लोटला. अखेर १४ जून रोजी रवींद्र शृगांरे यांच्यासह पाच रहिवाशांनी थेट पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर ठाणेदार ठाकरे यांनी दखल घेतली; पण जप्ती करताना कारवाई परिपूर्ण केली नाही. आलमारी सील न केल्याने त्यातील साहित्य लांबविले गेले. ठाणेदाराच्या या संशयास्पद कार्यशैलीची पोलीस आयुक्त चौकशी करतील काय?
पवनच्या आई-वडिलांचे नाव तक्रारीत नसतानाही सुमोटो कारवाई केली. महिलेने पवनच्या घरातून साहित्य नेल्याचे श्रुंगारेंनी आधीच सांगायला हवे होते.
मनीष ठाकरे
पीआय, गाडगेनगर ठाणे