पदाधिकारी मोकाट का ?
By admin | Published: August 20, 2016 12:02 AM2016-08-20T00:02:53+5:302016-08-20T00:02:53+5:30
प्रथमेश सगणेचा गळा चिरण्याची घटना अत्यंत क्रूर असून हा प्रकार नरबळीच्या उद्देशाने करण्यात आला आहे.
चांदुरात मोर्चा : मातंग समाज संघर्ष समिती संतप्त
चांदूररेल्वे : प्रथमेश सगणेचा गळा चिरण्याची घटना अत्यंत क्रूर असून हा प्रकार नरबळीच्या उद्देशाने करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. मात्र, या प्रकरणात संस्थाचालकही दोषी असल्याने शंकर महाराजांना तातडीने अटक करा, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी मातंग समाज संघर्ष समितीने उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले.
नरबळी प्रकरणात अटक केलेले आरोपी हे वसतिगृहातील मेसमधील कर्मचारी आहेत. त्यांची या प्रकरणात मुख्य भूमिका असली तरी या घटनेचा कर्ता करविता वेगळाच आहे. ही आश्रमशाळा व वसतिगृह हे शंकर महाराजांद्वारे संचालित असल्याने त्यांचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नरबळीचे मुख्य सूत्रधार म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मातंग समाज संघर्ष समिती व विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मोर्चात विविध संघटना मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सोरगिवकर, अनिल वानखडे, भाजप शहराध्यक्ष प्रमोद नागमोते, बबनराव गावंडे, सुधाकर डोंगरे, गजानन तायडे, बंडू आठवले, संतोष वानखडे, पुतळे, सुषमा खंडार, श्रीकृष्ण कल्हाने, लक्ष्मण लोखंडे, दादाराव स्वर्गे, सुनील लोखंडे, मधुकर बावने, पप्पू भालेराव आदींनी केले. (तालुका प्रतिनिधी)