कार्यालय, शाळा की धर्मशाळा ?
By admin | Published: October 4, 2016 12:22 AM2016-10-04T00:22:32+5:302016-10-04T00:22:32+5:30
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राजापेठ स्थित शाळेची अवस्था ‘नादार’ झाली आहे.
महापालिकेतील गौडबंगाल : अनधिकृत ताबेदारांना अभय का ?
अमरावती : महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अख्त्यारित असलेल्या राजापेठ स्थित शाळेची अवस्था ‘नादार’ झाली आहे. येथील शाळा कधीचीच बंद पडली असून तळमजल्यात बाजार व परवाना विभागाचे कार्यालय थाटण्यात आले आहे. मात्र पहिला मजला एका पदाधिकाऱ्याने अनधिकृतपणे ताब्यात ठेवल्याने ही शाळा की धर्मशाळा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
राजापेठकडून रेल्वे क्रॉसिंग पार केल्यानंतर श्रीराम मंदिराच्या समोरासमोर महापालिकेच्या मालकीच्या शाळेची दुमजली इमारत आहे. मात्र या शाळेच्या इमारतीत शाळा भरणे कधीचेच बंद झाले आहे. तद्नंतर टाऊन हॉलमध्ये असलेले बाजार व परवाना विभागाचे कार्यालय तेथे स्थलांतरित करण्यात आले.
या दुमजली शाळा इमारतीच्या तळमजल्याचा वापर बाजार व परवाना विभागाच्या अधीक्षकांसह अन्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन उपयोगासाठी केला जातो. या इमारतीत बाजार व परवाना विभागाचे कार्यालय असले तरी या इमारतीचे पालकत्व शिक्षण विभागाकडे आहे.
राजापेठस्थित शाळा इमारतीचा पहिला मजला कार्यालयीन उपयोगासाठी सत्कारणी लागला असला तरी पहिल्या मजल्यावरील विस्तीर्ण जागेत आनंदीआनंद आहे. व्यापक क्षेत्रफळाच्या एका खोलीत हेल्थसेंटरचे मोठे भंगार येथे ठेवण्यात आले आहे. हेल्थ क्लबसाठी उपयोगात येणाऱ्या मशिन्सचे सांगाड्यांनी ही एक खोली व्यापली आहे. दुसऱ्या एका खोलीतसुद्धा एका वृद्ध महिलेचे वास्तव्य आहे. या दुसऱ्या खोलीतही हेल्थ क्लबमधील काही भंगार यंत्रे धूळखात पडली आहेत. या खोलींचा ताबा एका पदाधिकाऱ्याकडे आहे. त्यानेच या इमारतीचे हक्क राखून ठेवल्याचे बोलले जाते. (प्रतिनिधी)
यंत्रणेवर
कुणाचा दबाव ?
बाजार व परवाना विभागाचे कार्यालय असलेल्या या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील भंगारासह अन्य साहित्याचे आणि रहिवासाचे हक्क तेथीलच एका लोकप्रतिनिधीने राखून ठेवल्याने या अनधिकृत प्रकारावर कुणीही ‘ब्र’ काढायला तयार नाही. यंत्रणेवर त्या व्यक्तीचाच अनामिक दबाव असल्याचे यंत्रणेतील उच्चपदस्थ अनौपचारिकरित्या कबूल करतात. त्यामुळे ही शाळा की धर्मशाळा? असा प्रश्न निर्माण होणे साहजिक आहे.
संपर्क कार्यालयासाठी मागितली होती जागा
जिल्ह्यातील एका विद्यमान लोकप्रतिनिधीने या इमारतीतील पहिला मजला संपर्क कार्यालयासाठी मागितला होता. तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी तशी चाचपणी सुद्धा केली होती. मात्र अनामिक दबावामुळे ते साध्य होवू शकले नाही. त्यानंतर भंगारावस्थेत पडलेल्या त्या विस्तीर्ण जागेत ‘पीएम आवास योजनेचा कक्ष वजा कार्यालय कार्यान्वित करणे प्रस्तावित आहे.
आयुक्तांचा लक्षवेध
महापालिका आयुक्त राजकीय दबावाला बळी न पडता निर्णय घेतात, असे पालिका यंत्रणेतून सांगितले जाते. त्यामुळे आयुक्त हेमंत पवार यांनी या शाळेच्या इमारतीवरील अनधिकृत ताबेदारांना तंबी देऊन ही सार्वजनिक मालमत्ता नियंत्रणमुक्त करावी, अशी सूचना दिली आहे. त्या खोलीमधील भंगार व अन्य अतिक्रमणाला कुठलेच आयुक्त ‘ब्रेक’ लावत नाहीत, अशी वंदता आहे. त्यामुळे पवारांच्या भूमिकेवर यंत्रणेसह सर्वसामान्य अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.