तपासणी पथकातील अधिकाऱ्यांचीही कोविड चाचणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 08:08 AM2020-11-24T08:08:27+5:302020-11-24T08:10:32+5:30
विधान परिषद निवडणूक : प्रकाश काळबांडे यांचे विभागीय आयुक्तांना निवेदन
अमरावती - राज्यात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यासाठी शिक्षकांना कोविड-१९ संंबधी चाचणी करणे बंधनकारक केले आहे. परंतु, तपासणीसाठी शाळांना भेट देणाऱ्या पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना अशी कुठलीही अट शासनाने घातली नाही. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोणातून तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांनादेखील कोविड-१९ ची चाचणी बंधनकारक करावी, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रकाश काळबांडे यांनी विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांच्याकडे केली.
२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. कोविड-१९ ची चाचणी झाल्यानंतरच शाळेत रुजू करून घेण्याचे सक्तीचे आदेश शासनाने दिल्यानंतर शिक्षकांनी चाचणी करून घेतली. विशेष म्हणजे, शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने शाळा तपासणी पथकाचीदेखील निर्मिती केली आहे. हे पथक दररोज विविध शाळांना भेटी देणार आहे. पथकातील एखाद्या व्यक्तीला कोरानाची लागण झाल्यास त्याचा प्रसार हजारो शिक्षक तसेच विद्यार्थ्यांपर्यंत होऊ शकतो. शासनाने तपासणी पथकातील कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना कोविड चाचणी बंधनकारक केलेली नाही. त्यामुळे समस्त शिक्षक बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांचीदेखील कोविड चाचणी करण्याचे आदेश शासनाने द्यावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने आम्ही करीत असल्याचे प्रकाश काळबांडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तपासणी पथकातील जे अधिकारी तसेच कर्मचारी चाचणी करून घेणार नाहीत, त्यांना तपासणी करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असेदेखील काळबांडे यांनी म्हटले आहे. यावेळी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांताध्यक्ष श्रावण बरडे यांचीदेखील प्रामुख्याने उपस्थिती होती.