जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धाचा फिव्हर, मुख्यालयात बहुतांश विभागात शांतता
By जितेंद्र दखने | Published: February 15, 2024 01:55 AM2024-02-15T01:55:27+5:302024-02-15T01:57:03+5:30
१४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर हा विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव होत आहे.
अमरावती : जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना बुधवार, १४ फेब्रुवारीपासून येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर अधिकारी व कर्मचारी क्रीडा महोत्सवाला प्रारंभ झाला. यानिमित्ताने जिल्हा परिषदेची बहुतांश यंत्रणा ही क्रीडा महोत्सवाचे यजमान पद असल्याने कामात गुंतली आहे. परिणामी मिनी मंत्रालयात सर्वत्र क्रीडामय वातावरण असल्याचे येथील मुख्यालयात दिसून आले. यामुळे प्रत्येक विभागात शांतता पसरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. बरेच अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाले आहेत. परिणामी महत्त्वाच्या कामानिमित्त जिल्हा परिषदेत आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून, किमान सोमवारपर्यत तरी जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हा क्रीडा महोत्सवाचा फिव्हर कायम राहणार असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
१४ ते १६ फेब्रुवारीदरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर हा विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव होत आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा अंबानगरीत होत असल्याने गत चार ते पाच दिवसांपासून मिनी मंत्रालयाची यंत्रणा या कामात व्यस्त आहे. १६ला क्रीडा महोत्सवाचा समारोप होणार आहे. लगेच १७ फेब्रुवारीला शनिवार शासकीय सुटी आहे. त्यानंतर रविवार व सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची शासकीय सुटी असल्याने सलग आठवडाभर अधिकारी आणि कर्मचारी रिलॅक्स होणार असले तरी सर्वसामान्यांना मात्र चांगलेच टेन्शन येणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्रीडा महोत्सव हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर पार पडला आणि आता एका महिन्यात पुन्हा विभागीय क्रीडा महोत्सवाची धूम सुरू आहे.
पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने, रेस्टहाऊस फुल्ल
क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने स्पर्धेसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्थासुद्धा जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहासह, पदाधिकारी असलेल्या सभापतींच्या शासकीय निवासस्थानांमध्ये केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सध्या फिलगुल वातावरण पाहायला मिळत आहे.
केवळ क्रीडा स्पर्धेशी संबंधित तसेच आयोजन समितीमधीलच कर्मचारी या क्रीडा महोत्सवात आहेत. उर्वरित कर्मचारी आपापल्या विभागातच कर्तव्यावर आहेत. कामानिमित्त आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नयेे, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
डाॅ. कैलास घोडके, डेप्युटी सीईओ जीएडी