वा रे वा सुरक्षा! एका रेल्वेत चार बंदूकधारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2022 05:00 AM2022-02-20T05:00:00+5:302022-02-20T05:01:06+5:30
रेल्वेत रात्रीच्या प्रवासात अप्रिय घटनेप्रसंगी १३९ या क्रमांकाच्या नावाने रेल मदत ही सुविधा उपलब्ध आहे. टि्वटर, व्हाॅट्स ॲप व अन्य मीडियाचा वापर करून सुरक्षेसाठी ऑनलाईन वापर केला जातो. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्लॅटफार्म अथवा रात्रीच्या वेळी रेल्वेत सुरक्षेसाठी धावून जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वे स्थानक, प्रवासी अथवा मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलाकडे दिली आहे. मात्र, रेल्वेत रात्रीचा प्रवास असुरक्षित असून, चोऱ्या, दरोडे, साहित्याची उचलेगिरी ही नित्याचीच बाब असल्याचे यापूर्वी घडलेल्या विविध घटनांवरून स्पष्ट होते. तथापि २५ ते २८ डब्यांच्या रेल्वेत केवळ चार बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बडनेरा ते भुसावळ रेल्वे स्थानकादरम्यान रात्रीच्या गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी नेमले जातात. रात्रीच्या रेल्वेत बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्याची नियमावली आहे.
रात्रीच्या वेळी रेल्वेत प्रवासी असुरक्षित असल्यास ऑनलाईन अथवा कर्तव्यावरील रेल्वे सुरक्षा दलाला तक्रार प्राप्त झाल्यास त्वरित कारवाई करतात. बडनेरा व अकोला येथून धावणाऱ्या रेल्वेत सुरक्षा दलाचे कर्मचारी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमले जात असल्याची माहिती आहे.
एका रेल्वेत चार बंदूकधारी
- बडनेरा, अकोला येथून रात्रीच्या वेळी धावणाऱ्या रेल्वेत चार बंदूकधारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात येतात.
- मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या वरिष्ठांनी भुसावळ ते बडनेरा या दरम्यान रात्रीच्या वेळी धावणाऱ्या पाच रेल्वे गाड्यांमध्ये २० सुरक्षा दलाचे कर्मचारी नियुक्त केले आहे.
सुरक्षेसाठी ऑनलाईनच्या किती वापर?
रेल्वेत रात्रीच्या प्रवासात अप्रिय घटनेप्रसंगी १३९ या क्रमांकाच्या नावाने रेल मदत ही सुविधा उपलब्ध आहे. टि्वटर, व्हाॅट्स ॲप व अन्य मीडियाचा वापर करून सुरक्षेसाठी ऑनलाईन वापर केला जातो. रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी प्लॅटफार्म अथवा रात्रीच्या वेळी रेल्वेत सुरक्षेसाठी धावून जातात.
सुरक्षा दलाकडे किती कर्मचारी?
बडनेरा व अमरावती रेल्वे स्थानकावर सुरक्षा दलाचे स्वतंत्र युनिट आहे. त्यानुसार बडनेरा येथे सुरक्षा दलात ३८ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, रात्रीच्या रेल्वेत बंदूकधारी सुरक्षा दलाचे २० कर्मचारी भुसावळ येथून स्वतंत्रपणे नियुक्त करण्यात आले आहे.
रात्रीच्या वेळी रेल्वेत चोरी, दराेडे व इतर घटनांवर अंकुश लावण्यासाठी सुरक्षा दल आहे. बडनेरा येथून पाच गाड्यांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ कर्मचारी तैनात केले जाते. कंट्रोल रूममधून येणाऱ्या तक्रारीची सुरक्षा दल दखल घेतात.
- बी.एस. नरवार, निरीक्षक, रेल्वे सुरक्षा दल, बडनेरा