डाळिंबावर तेल्याचे संकट

By admin | Published: September 8, 2015 12:07 AM2015-09-08T00:07:41+5:302015-09-08T00:07:41+5:30

ढगाळ वातावरण, कडक ऊन, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, डाळिंबाच्या क्षेत्रात बिब्ब्या रोगाचा (तेल्या डागा) प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

Oil crisis on pomegranate | डाळिंबावर तेल्याचे संकट

डाळिंबावर तेल्याचे संकट

Next

कृषी विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष : वातावरण बदलाचा होतोय परिणाम
अमरावती : ढगाळ वातावरण, कडक ऊन, वातावरणातील बदल, तुरळक पाऊस, डाळिंबाच्या क्षेत्रात बिब्ब्या रोगाचा (तेल्या डागा) प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
दरवर्षी फुलात असणाऱ्या किंवा सुपारीच्या आकाराच्या डाळिंबाच्या फळावर या रोगाचे आक्रमण होते. यंदा मोठ्या आकारातील फळांवरदेखील या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत शेतकरी आहे.
कृषी विभागाच्या विविध योजनेच्या अंतर्गत व ठिबक सिंचनाच्या योजनेंतर्गत या डाळिंबाच्या बागांची लागवड शेतकऱ्यांनी केली. पहिल्या वर्षी डाळिंबाचा खर्च खूप असल्याने शेतकऱ्यांनी बँकांचे कर्ज काढले आहे. हे सर्व शेतकरी आता अडचणीत आले आहेत. बिब्ब्या बॅक्टेरिया या विषाणूपासून हा रोग होतो. पाने व फळांवर गोलाकार पाणीदार डाग पडतात. काही तासांतच हा डाग गडद तपकिरी किंवा काळपट होतो. डागाच्या ठिकाणी उंचवटा मार होऊन फळांना छिद्र पडतात. ही सर्व प्रक्रिया अत्यंत कमी कालावधीत पडते. या रोगाचा प्रादुर्भाव झालेले कित्येक दव फळे शेतकऱ्यांनी फेकून दिली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
असे करावे व्यवस्थापन
तेल्या हा अतिशय सूक्ष्म जिवाणूजन्य रोग असून हवेतून प्रसार होतो. हा रोग झॅन्थोमोनास अ‍ॅन्झोनोपोडीस पी.व्ही. पुनिसी या जिवाणुमुळे पसरतो. या रोगास 'खज' रोग, जीवाणुजन्य ठिपके किंवा काळा ठिपका या नावानेही ओळखतात. ढगाळ वातावरणात त्याची वाढ अति वेगाने होते. या रोगाला डाळिंबाच्या सर्वच जाती बळी पडतात. या रोगामुळे साधारणपणे ४० ते ५० टक्के तर अनुकूल वातावरणात आणि साथीसारखा पसरल्यास ९० ते १०० टक्केपर्यंत नुकसानीची नोंद आहे. साधारणपणे या रोगाच्या वाढीस २५ ते ३२ अंश सेल्सिअस तापमान आणि ३५ ते ८५ टक्के आर्द्रता पोषक ठरते. लागून पडलेल्या रिमझिम पावसाळी वातावरणात या रोगाचा प्रसार झपाट्याने वाढतो. तसेच रोगग्रस्त भागाचा चांगल्या भागाशी संपर्क आल्यास अथवा स्पर्श झाल्यास पावसाच्या थेंबाद्वारे, शेतातील अवजारे, कामे करणारे मजूर, कीटक, मधमाशा, मुंगळे, मुंग्या व फुलपाखरे इत्यादी माध्यमांद्वारे या रोगाचा प्रसार होतो. या रोगाचे जिवाणू झाडांच्या अवशेषात १२० दिवसांपर्यंत सुप्तावस्थेत राहतात.

डाळिंबावर येणाऱ्या रोगावर उपाययोजना
१) मृगबहराऐवजी उशिराचा हस्तबहार अथवा आंबे बहार घ्यावा २) डाळिंबाला अति प्रमाणात पाणी देऊ नये ३) झाडाला पाण्याचा ताण देऊन साधारणपणे ४ महिने विश्रांती द्यावी ४) रोगांचा जास्त प्रादुर्भाव असलेली झाडे काढून जाळून टाकावीत ५) रोगाची लागण मोठ्या प्रमाणात असल्यास रोगग्रस्त फांद्यांची खरड छाटणी करावी. छाटणी रोगाची लागण असलेल्या भागाच्या ५ ते ६ से.मी. मागील भागासह करून खोडावरील लागण झालेला भाग चाकुने खरडून काढावा. मात्र, यावेळी वापरावयाची साधने व जखम पोटॅशियम परमॅग्नेट किंवा सोडियम हॅड्रोेक्लोराईडच्या द्रावणाने निर्जंतुक करावीत. तसेच रोगग्रस्त खरड जमिनीवर न पडू देता एखाद्या कापडावर पाडून जाळून टाकावी ६) काडीकचरा व तणांचा नायनाट करून बाग नेहमी स्वच्छ ठेवावी ७) डाळिंब बागेचे पाणी व खत व्यवस्थापन बागेतील सर्व झाडे सुदृढ व निरोगी राहतील, असे व्यवस्थापन करावे.
उपाययोजना : १) बाग ताणावर सोडल्यास तसेच झाडांची छाटणी केल्यानंतर कॉपर आॅक्सिक्लोराईड (०.२५ टक्के) २५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोसायक्लिन ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किंवा १ टक्का बोर्डो मिश्रणाची पावडर मिसळून तयार केलेले द्रावण झाडांच्या वाफ्यात ओतावे. ३) पंधरा दिवसांच्या अंतराने १ टक्का बोर्डो मिश्रणाची नियमित फवारणी करावी. (१०० लिटर पाण्यात १ किलो कळीचा चुना व एक किलो मोरचूद मिश्रण करावे), ४) तेल्या रोगाची लक्षणे दिसून येताच कॉपर आॅक्सिक्लोराईड (०.२५ टक्के) २५ ग्रॅम अधिक स्ट्रप्टोसायक्लिन ५ ग्रॅम अधिक ब्रोनोपॉल ५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून झाडांवर काळजीपूर्वक फवारणी करावी.

डाळिंबावर येणाऱ्या रोगाची लक्षणे
रोगाचा प्रसार प्रामुख्याने पाने, पुले, फांद्या, खोड तसेच फळांवर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. प्रथम पानावर लहान आकाराचे ठिपके दिसून येतात. पुढे हे ठिपके मोठे होऊन अनियमित आकाराचे दिसतात व एकमेकांत मिसळतात. डागासभोवती अंधुक पिवळसर कडा दिसतात. फांद्यांवरील डोळ्याजवळ तसेच कळ्या व फुलांवरसुध्दा पाणीदार काळपट करड्या रंगाचे गोलाकार तेलकट डाग आढळतात. डाळिंबाची फळे या रोगास नाहक बळी पडतात. प्रथमत: फळांच्या देठावर लहान तेलकट काळे ठिपके पडतात. त्यानंतर हे ठिपके काळसर तपकिरी रंगाचे होऊन फळावर पसरतात व मोठे होतात.
नुकसान : पाने पिवळसर व काळपट पडून गळतात. रोगाची लागण झालेल्या फांद्या तडकून तुटतात व वाळतात. रोगग्रस्त फळे तडकतात. त्यावर इंग्रजी ‘वाय’ किंवा ‘एल’ आकाराच्या भेगा पडून फळातील दाणे बाहेर पडतात व फळे खोलगट होऊन दबल्यासारखी दिसतात. पावसाळी वातावरणात तर फळावर पाणी साचून राहिल्यास फळांतून पांढऱ्या रंगाचा चिकट द्रवपदार्थ निघतो. पुढे आर्द्रता कमी झाल्यावर फळांवर पांढरे चमकदार आवरण दिसून येते. फळांची प्रत खराब होण्यासोबतच फळे सडून डाळिंब उत्पादनात मोठी घट येते.

Web Title: Oil crisis on pomegranate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.