आॅईल मिल उद्योजकाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:10 PM2018-02-05T22:10:14+5:302018-02-05T22:11:01+5:30
क्षुल्लक रकमेसाठी कामगाराने तीक्ष्ण शस्त्राने वार करून आॅइल मिल मालकाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एमआयडीसीत घडली. ठाकूरदास दुल्लाराम करेसीया (७६,रा. वृदांवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : क्षुल्लक रकमेसाठी कामगाराने तीक्ष्ण शस्त्राने वार करून आॅइल मिल मालकाची हत्या केल्याची घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एमआयडीसीत घडली. ठाकूरदास दुल्लाराम करेसीया (७६,रा. वृदांवन कॉलनी) असे मृताचे नाव आहे. या हत्याप्रकरणात राजापेठ पोलिसांनी विश्वास रामूजी शेषकार (४८, रा. राजनापूर्णा, आसेगाव) याला अटक केली आहे.
विश्वास शेषकार हा दोन वर्षांपासून ठाकूरदास करेसीया यांच्या राजेंद्र आॅइल मिलमध्ये हेल्पर होता. अनेकदा तो कामावर गैरहजर राहत होता. गेल्या दोन महिन्यांपासून तर तो अनेकदा कामावर आलाच नव्हता. रविवारी दुपारच्या सुमारास विश्वास शेषकार राजेंद्र आॅइल मिलमध्ये गेला. नातेवाइकाच्या लग्नाचे कारण सांगून ठाकूरदास करेसीया यांना अडीच हजारांची मागणी केली. मात्र, त्यांनी पैसे दिले नाही. यावेळी विश्वास तेथून निघून गेला. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो पुन्हा आला आणि कार्यालयात बसलेले ठाकुरदास करेसीयांकडे पुन्हा पैशांची मागणी करीत वाद घातला. याच सुमारास लघुशंका करण्यासाठी बाथरूमकडे जात असलेले ठाकूरदास करेसीया यांच्या डोक्यावर विश्वासने तीक्ष्ण हत्याराने वार केले आणि तेथून पलायन केले. ठाकूरदास हे तेथेच निपचित पडले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी आले नसल्याचे पाहून मुलगा नरेंद्र करेसीया यांनी चौकीदार राजकुमार ढोले यांच्याशी संपर्क केला. ढोले यांना ठाकूरदास हे कार्यालयातील बाथरुमजवळ मृतावस्थेत आढळून आले. खासगी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा अंदाज होता. मात्र, डोक्यावरील गंभीर जखमांमुळे या घटनेची माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी विश्वास शेषकारविरुद्ध भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे.
सीसीटीव्हीमुळे बिंग फुटले
राजेंद्र आॅइल मिलच्या कार्यालयाबाहेरील सीसीटीव्हीत आरोपी विश्वास शेषकार कैद झाला आहे. तो कार्यालयाच्या आत गेला आणि काही वेळानंतर बाहेर आल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. बाथरुमकडील बाजूला सीसीटीव्ही नसल्यामुळे विश्वास शेषकारने हत्या कशी केली, ही बाब स्पष्ट झाली नव्हती.
आरोपीला अटक
राजापेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर सूर्यवंशी, दुय्यम ठाणेदार तिवारी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक अनिल मुळे, शिपाई अशोक वाटाणे, अतुल संभे, राहुल डेंगेकर, अमोल खंडेझोड व शेख दानिश यांनी चौकशी सुरू केली. एका पथकाने एमआयसीडीत शोध घेतला, तर एक पथक राजनापूर्णा येथे गेले. तो सोमवारी सकाळी गावात दाखल होताच पोलिसांनी पकडून राजापेठ ठाण्यात आणले.