थोराडाची रोडरोमियोगिरी; मुलांना रस्त्यात अडवून म्हणाला, ‘मला तुमची आई पसंत आहे’

By प्रदीप भाकरे | Published: June 15, 2023 12:58 PM2023-06-15T12:58:08+5:302023-06-15T12:58:46+5:30

गाडगेनगरमधील घटना : महिलेच्या घरासमोर चकरा, मेरी गर्लफ्रेंड उपर के मजले पर रहती है म्हणत बदनामी

old man booked for following and defamation of a woman | थोराडाची रोडरोमियोगिरी; मुलांना रस्त्यात अडवून म्हणाला, ‘मला तुमची आई पसंत आहे’

थोराडाची रोडरोमियोगिरी; मुलांना रस्त्यात अडवून म्हणाला, ‘मला तुमची आई पसंत आहे’

googlenewsNext

अमरावती : एका महिलेच्या मुलामुलीला रस्त्यात अडवून ‘मला तुमची आई पसंत आहे’ अशा शब्दात एका ५२ वर्षीय थोराडाने रोडरोमियोगिरी केली. १२ जून रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी १४ जून रोजी पहाटे आरोपी लक्ष्मण खियानी (५२) याच्याविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. महिलेच्या घरासमोर पोहोचून त्याने तेथील लोकांकडे ‘मेरी गर्लफ्रेंड उपर के मजले पर रहती है!’ अशी बतावणी केली.

तक्रारीनुसार, फिर्यादी महिला ही भाजीपाला घेण्याकरिता गेली असता आरोपी लक्ष्मण खियानी याने तिचा पाठलाग केला. त्यावेळी ती त्वरेने घरी परतली असता तो थेट पाठलाग करत तिच्या घरापर्यंत पोहोचला. घराबाहेर थांबून तिच्या रुमकडे एकटक पाहत होता. त्यास घराशेजारील लोकांनी विचारले असता ‘मेरी गर्लफ्रेंड उपर के मजले पर रहती’ असे उत्तर त्याने दिले. त्यामुळे महिलेची सामाजिक बदनामी झाली. आरोपीच्या निर्लज्जपणाचा कळस म्हणजे तो रात्री १२ ते एकच्या सुमारास देखील महिलेच्या घरासमोर चक्कर मारताना दिसून आला.

मुलामुलींसमोर आईची बदनामी

दरम्यान १३ जून रोजी सकाळदरम्यान फिर्यादी महिलेचा मुलगा व मुलगी हे दुकानावर कामावर जात असतांना आरोपी लक्ष्मणने त्यांना थांबविले. मला तुमच्या घरी यायचे आहे. मला तुमची आई पसंत आहे असे सांगितले. मुले घरी परतल्यानंतर त्यांनी सकाळी घडलेला प्रसंग आईला सांगितला. आरोपीचा पाठलाग घरापर्यंत व कुटुंबियांपर्यंत पोहोचल्याने अखेर महिलेने मनाचा हिय्या करत १४ जून रोजी पोलीस ठाणे गाठले. आरोपी हा आपल्यावर वाईट नजर ठेऊन पाठलाग करण्यासह झालेला सर्व प्रकार महिलेने तक्रारीत नमूद केला.

Web Title: old man booked for following and defamation of a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.