संकेतस्थळावर जुनेच ‘एसपी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 10:36 PM2019-01-20T22:36:04+5:302019-01-20T22:36:48+5:30
प्रथम खबरी अहवालासह पोलिसांचे बहुतांश कामकाज संगणकीकृत झाले असताना अमरावती ग्रामीण पोलिसांना ‘अपडेशन’चे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रथम खबरी अहवालासह पोलिसांचे बहुतांश कामकाज संगणकीकृत झाले असताना अमरावती ग्रामीण पोलिसांना ‘अपडेशन’चे वावडे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नवा चेहरा येऊन सहा महिले होत असताना पोलिसांच्या अधिकृत संकेतस्थळावर अद्यापही तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनाषकुमार यांचे छायाचित्र झळकत आहे. संकेतस्थळाच्या ‘वॉल’वर अमरावती पोलीस अधीक्षक म्हणून अभिनाषकुमार यांचे ‘मिशन स्टेटमेंट’ आहे. तेच विद्यमान पोलीस अधीक्षक असल्याचे अधिकृत संकेतस्थळ सांगत असल्याने ग्रामीण पोलीस अद्यापही अभिनाषकुमार यांच्या कार्यकाळातून बाहेर पडले नाहीत, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस दलाचे ‘अमरावती रुरल पोलीस डॉट जीओव्ही डॉट इन' असे संकेतस्थळ आहे. यावर सर्व पोलीस अधीक्षक, त्यांचा कार्यकाळ, प्रथम खबरी अहवाल नोंदविण्याच्या सुविधेसह अन्य माहिती उपलब्ध आहे. या संकेतस्थळाच्या पहिल्या पानावर अद्यापही सहा महिन्यांपूर्वी बदलून गेलेल्या तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांचे छायाचित्र आहे. जुलै २०१८ च्या शेवटच्या आठवड्यात अभिनाषकुमार यांची बदली झाली. दिलीप झळके पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. तथापि, ते अद्यापही संकेतस्थळावर झळकलेले नाहीत. त्यामुळे या संकेतस्थळास भेट देणाऱ्या नागरिकांचा बुद्धीभेद होण्याची दाट शक्यता आहे.
पोलीस वा प्रसिद्धी माध्यमांशी फारसा संबंध नसलेल्यांच्या लेखी अभिनाषकुमारच पोलीस अधीक्षक असल्याचा चुकीचा संदेश जाऊ शकतो. दिलीप झळके यांनी पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे घेऊन सहा महिने होत असताना ग्रामीण पोलिसांच्या संगणक विभागाची ही लेटलतिफी राज्यशासनाच्या जलद प्रशासनाच्या चिंधड्या उडविणारी ठरत असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.
महत्त्वाच्या लिंक उघडेनात
ग्रामीण पोलिसांच्या या संकेतस्थळावर प्रतिसाद अॅप, फेसबुक पेज, ट्विटर पेज अशा महत्त्वाच्या लिंक दिल्या आहेत. या लिंकवर क्लिक केल्यास त्यासंदर्भातील पेज उघडणे अभिप्रेत असताना या तीनही लिंक उघडत नाहीत. विशेष म्हणजे विपरित परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना वेळेवर पोलिस मदत मिळावी, यासाठी प्रतिसान अॅप कार्यान्वित करण्यात आला होता. तथापि, या संकेतस्थळावरील ही लिंक बंद आहे.
डीसीआर येईना
ग्रामीण पोलिसांच्या याच संकेतस्थळावर वर्षे -दोन वर्षांपूर्वी डीसीआर (डेली क्राईम रिपोर्ट) यायचे. तथापि, १८ मार्च २०१७ नंतर यात डीसीआर अपलोड करण्यात आलेले नाहीत. ते आता इमेलद्वारे पाठविले जातात. याशिवाय सांख्यिकी या लिंकवर गेल्यास पेज उघडते खरे, परंतु, त्यावर कुठलीही माहिती दिसत नाही.
पोलीस अधीक्षकांनी द्याव्या सूचना
अमरावती ग्रामीण पोलिसांच्या संकेतस्थळाला अपडेशनची नितांत गरज आहे. पोलीस अधीक्षक दिलीपकुमार झळके यांनी याबाबत अधिनिस्थ यंत्रणेस सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा आहे. शहर पोलिसांच्या संकेतस्थळाप्रमाणे दैनंदिन डीसीआर संकेतस्थळावर देण्याची सुविधा नव्याने कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण
सहा महिन्यांचा काल लोटल्याने यासंदर्भात ग्रामीण पोलीस मुख्यालयातील संगणक शाखेशी संपर्क साधला असता, या संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण केले जात असल्याची माहिती पुरविण्यात आली.
संकेतस्थळ अद्ययावत करण्यात येईल. तूर्तास क्रीडा स्पर्धेसाठी नागपूरला असल्याने सोमवारी अधिनिस्थ यंत्रणेकडून माहिती घेऊ.
- दिलीप झळके,
पोलीस अधीक्षक