जुनी पाठयपुस्तके आता रद्दीऐवजी दप्तरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:21+5:302020-12-12T04:30:21+5:30
अमरावती : वर्ष सुरू झाले की, नवीकोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे ...
अमरावती : वर्ष सुरू झाले की, नवीकोरी पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात दिसतात आणि वर्ष संपले की, तीच पुस्तके रद्दीत गेल्याचे दिसून येतात. मात्र, हे नुकसान टाळण्यासाठी शासनाने आता पुस्तकांचा पुनर्वापर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यात लाखो पुस्तके वापरात येणार असल्याने यात लाखो रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे.
सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी झाल्यानंतर २००९ पासून राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी संस्थांच्या पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठपुस्तके वाटप केली जातात. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण हा त्यामागील उद्देश आहे. या योजनेत सुमारे लाखाेच्या संख्येने पुस्तकांचे वाटप केले जातात. यापोटी लाखो रुपयांचा खर्च दरवर्षी केला जातो. विशेष म्हणजे एका पाठ्यपुस्तकाचा संच विद्यार्थ्यांनी चांगला वापरल्यास दोन ते तीन वर्षे सहज उपयोगात येतो. मात्र, यापूर्वी या पुनर्वापरावर विशेष लक्ष न दिल्याने दरवर्षी नवी पुस्तके वाटपाची योजना सुरू आहे.
बॉक्स
पुनर्वापराचा निर्णय
शिक्षण विभागाने पर्यावरणाचे संवर्धन आणि कागदाची बचत करण्यासाठी एकदा वापरलेल्या पाठपुस्तकांचा पुनर्वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जतनासाठी वापर कमी करणे आणि पुनर्वापर करणे ही संकल्पनाही या माध्यमातून रुजविली जावी, हा यामागील उद्देश आहे.
बॉक्स
प्रायोगिक तत्त्वावर निर्णय
यापुढे आता विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पाठपुस्तकांपैकी ज्यांची पुस्तके योग्यरीतीने जपवणूक करून सुस्थितीत ठेवलेली आहे अशी पुस्तके संकलित करून पुढील वर्षी विद्यार्थ्यांना वाटावीत, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. जून २०२१ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांकडे याची जबाबदारी दिलेली आहे. यावषी प्रायोगिक तत्त्वावर या उपक्रमातून किती पाठपुस्ते जमा होतील. तसेच विद्यार्थी किंवा पालकांचा किती प्रतिसाद मिळतो, यावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
कोट
यासंदर्भात शासन पातळीवरून पत्र मिळाले आहे. सदर पत्रातील सूचनेप्रमाणे अंमलबजावणी केली जाईल.
- ई.झेड.खान,
शिक्षणाधिकारी (प्राथमिक)