ऑलिम्पिक व्हाया अमरावती - साताऱ्याच्या प्रवीण भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:45+5:302021-07-20T04:10:45+5:30
---------------------------------------------------------------------------------------- रिकर्व्ह आर्चरीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार क्रीडा प्रबोधिनीचा माजी विद्यार्थी, अंबानगरीचा लौकिक वाढविला धीरेंद्र चाकोलकर - अमरावती : स्थानिक ...
----------------------------------------------------------------------------------------
रिकर्व्ह आर्चरीमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार क्रीडा प्रबोधिनीचा माजी विद्यार्थी, अंबानगरीचा लौकिक वाढविला
धीरेंद्र चाकोलकर - अमरावती : स्थानिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेऊन धनुर्विद्येच्या रिकर्व्ह आर्चरी या प्रकारात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक मिळविलेला प्रवीण रमेश जाधव हा टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. रोजंदारी मजुराच्या घरात जन्मलेल्या या धनुर्धराचा येथपर्यंत प्रवास हा रोमांचक आहे. त्याच्या रूपाने अमरावतीच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सातारा जिल्ह्यातील सरडे या गावी जन्मलेल्या २२ वर्षीय प्रवीणला खेळाची आवड बालपणापासून होती. रोजंदारी मजुराच्या घरी मात्र रोज कमावण्याचे वांधे, त्यात मुलांच्या आवडींकडे पाहायला कुठे सवड मिळणार? मात्र, त्याचे प्राथमिक शिक्षक विजय भुजबळ व शुभांगी भुजबळ यांनी त्याची गुणवत्ता हेरली आणि त्याच्याकडून सराव करून घेतला. त्याच्या प्रशिक्षणाच्या खर्चाची बाजू सांभाळली. शाळांमध्ये होणाऱ्या बॅटरी टेस्टद्वारे २००१ मध्ये १३ वर्षांच्या प्रवीणची क्रीडा प्रबोधिनीमध्ये निवड झाली. त्याची एकाग्रता कमालीची असल्याचे लक्षात घेऊन धनुर्विद्या सरावाला सुरुवात झाली. त्याची प्रकृती नाजूक असली तरी फिटनेस अचंबित करणारा होता, अशी आठवण ज्येष्ठ खेळाडू पवन जाधव यांनी सांगितली.
प्रवीणने इंडियन राऊंड प्रकारापासून खेळाला तसेच स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. क्रीडा प्रबोधिनी प्रशिक्षक सुनील ठाकरे, अमर जाधव व इतर वरिष्ठ खेळाडूंच्या मार्गदर्शनात काही दिवसांत तो रिकर्व्ह प्रकारात खेळायला लागला. क्रीडा प्रबोधिनीचे धनुर्विद्या प्रशिक्षक प्रफुल डांगे यांचे मोलाचे व प्रेरणादायी मार्गदर्शन त्याला लाभले. क्रीडा प्रबोधिनी नंतर प्रवीणने रंजित चामले यांच्या मार्गदर्शनात पुणे येथे सराव करून अनेक स्पर्धांमध्ये चमक दाखविली. त्याच्या बळावर २०१७ मध्ये भारतीय सैन्यात रुजू झालेला प्रवीण नायब सुभेदार आहे.
प्रवीणचे शालेय तसेच पदवीचे शिक्षण अमरावतीत झाले. प्रवीणने सहभाग घेतलेल्या पहिल्याच राष्ट्रीय शालेय स्पर्धेतच रिकर्व्ह राऊंड गटात चार सुवर्णपदके पटकावली. जागतिक विद्यापीठ स्पर्धेत त्याने अमरावतीचे प्रतिनिधित्व केले आहे. वरिष्ठ गट राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदकानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक तिरंदाजी स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्व करीत पदके पटकाविली. सन २०१९ मध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत वरिष्ठ तिरंदाज अनु दास, तरुणदीप राॅय यांच्यासमवेत प्रवीणने सांघिक रजत पदक पटकावत टोकियो येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेकरिता पात्रता मिळविली. २३ ते ३१ जुलै दरम्यान ही स्पर्धा होत आहे.
गेल्या आठवड्यात नेदरलँड्समधील ‘एस-हर्टोजेनबॉश’ येथे जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारतीय पुरुषांच्या रिकर्व्ह संघाने उपविजेतेपद मिळवत ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली. प्रवीण जाधवने आतापर्यंतच्या सहा वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला.
भारतीय धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे, क्रीडा उपसंचालक विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी त्याच्या यशाचे कौतुक केले आहे.
--------------
पंतप्रधानांकडून शुभेच्छा
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवीणचे कौतुक केले. ‘मनकी बात’ या कार्यक्रमात त्याचा उल्लेखदेखील केला.
--------------