लक्ष्मीपूजनाकरिता घुबडाची तस्करी
By Admin | Published: November 7, 2015 12:14 AM2015-11-07T00:14:13+5:302015-11-07T00:14:13+5:30
लक्ष्मीचे वाहन म्हणून प्रसिध्द असलेल्या घुबडाला सर्वसामान्य माणूस अशुभ समजतात. दिवाळी हा सण मात्र घुबडासाठी मृत्यूची घंटा ठरतो आहे.
वनविभाग झोपेत : धामणगाव तालुक्यात वनाधिकाऱ्यांचे मिळतेय सहकार्य
मोहन राऊ अमरावती
लक्ष्मीचे वाहन म्हणून प्रसिध्द असलेल्या घुबडाला सर्वसामान्य माणूस अशुभ समजतात. दिवाळी हा सण मात्र घुबडासाठी मृत्यूची घंटा ठरतो आहे. अंधश्रध्देपोटी धनप्राप्तीकरिता या घुबडाचा मांत्रिकाच्या साहाय्याने बळी दिला जातो. घुबडांच्या तस्करीसाठी धामणगाव तालुक्यातील वनविभागाचे सहकार्य या तस्करांना मिळत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे़
घुबड हा निशाचर प्राणी असला तरी रात्री व्यवस्थितरीत्या पाहू शकतो़ शिकारी पक्ष्यांमध्ये घुबडाचे कान तीक्ष्ण असतात़ दिवसा इतर पक्ष्यांची स्पर्धा टाळत हा घुबड रात्री शिकार करतो. पक्ष निरीक्षकांचा हा आवडता प्राणी असला तरी सर्वसामान्य माणूस त्याला अशुभ मानतो. परंतु अशुभ मानणारे काही मांत्रिक गुप्तधनासाठी घुबडाचा बळी घेतात़
व्यापारीही झाले सक्रिय
घुबडाला लक्ष्मीचे वाहन म्हणून समजले जाते़ जेथे घुबड तेथे लक्ष्मी नांदते, असा अर्थ मांत्रिक काढतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी घुबडांचा बळी देण्याचे प्रमाण वाढले आहे़ मंदीवर मात करण्यासाठी काही व्यापारी एक लाखाच्या जवळपास घुबड खरेदी करण्याचा हा अघोरी मार्ग पत्करते़ सुवर्णकरड्या रंगाच्या घुबडाला मोठी मागणी आहे. त्यासाठी मांत्रिक संपूर्ण जंगल पिंजून काढतात. जेवढे मोठे घुबड तेवढा पैसा घरात अधिक येणार, असा गैरसमज घुबडाच्या जीवावर बेतणारा आहे़ दिवाळीच्या दिवशी घुबडाचा बळी देऊन रक्त घरात शिंपडण्याची अघोरी प्रथा मांत्रिक करीत असल्याची माहिती आहे.
घुबडाची पूजा केल्याने धनप्राप्ती होते, अशी अंधश्रध्दा असल्याने दिवाळीच्या तोंडावर घुबडाची तस्करी होऊ शकते. या भागात रात्रीला घुबडांची तस्करी होत असेल तर त्यासंदर्भातील माहिती पोलीस ठाण्यात कळविली जाईल.
- ए.एन. गावंडे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, चांदूररेल्वे.