१७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता एक मिनिटांसाठी थांबणार राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 06:49 PM2022-08-13T18:49:27+5:302022-08-13T18:50:01+5:30
Amravati News देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे.
अमरावती : देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी पर्वाचा समारोप १७ ऑगस्टला होणार असून, यानिमित्त सकाळी ११ वाजता महाराष्ट्र एक मिनिटांसाठी स्तब्ध होणार आहे. नागरिक एक मिनिटांसाठी जेथे असतील तेथेच थांबतील आणि सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी होतील.
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’निमित्त ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत समूह राष्ट्रगीत गायनाबाबतचा निर्णय घेतला आहे. ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यभरात ‘स्वराज्य सप्ताह’अंतर्गत विविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहे. समूह राष्ट्रगीत गायन हा उपक्रम शासनाच्या ३९ विभागांना बंधनकारक करण्यात आला आहे. या राष्ट्रगीत गायनासाठी खासगी, शासकीय तसेच सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षकांचा सहभाग अनिवार्य असणार आहे. सकाळी ११ वाजता सुरू होऊन ११ वाजून १ मिनिटांत राष्ट्रगान गायन करणे अपेक्षित आहे. समूह राष्ट्रगीत गायनाच्या वेळी जाणते-अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची दक्षता नागरिकांना घ्यावी लागणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे असेल नियंत्रण
राज्यात एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन होत असल्याने विद्यार्थी, नागरिक वा अधिकारी, कर्मचाऱ्यांना खुल्या जागा वा हॉल किंवा पटांगणात एकत्रित उपस्थित राहावे लागेल. सर्व प्रकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांना या उपक्रमात सहभागी व्हावे लागणार आहे. या उपक्रमाचे नियंत्रण जिल्हाधिकऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. जाणीव जागृती, प्रचार व प्रसिद्धीसाठी यंत्रणांना पुढाकार घेण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्राचा लोगो ठरला लक्षवेधी
गत वर्षीपासूनच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने ३९ विभागांना कृतिशील कार्यक्रम आखून दिला आहे. ७५ वर्षपूर्तीनिमित्त राज्य शासनाने स्वतंत्र लाेगो तयार केला असून, वर्षभर या लोगोचा वापर करण्यात आला आहे. शासकीय इमारतींवरही स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचा लोगो लक्ष वेधून घेणारा ठरला. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा लोगो हटके राहिला, हे विशेष.