नवीन जवानांना प्रशिक्षण देताना पोलीस हवालदाराचा ऑनड्युटी मृत्यू
By प्रदीप भाकरे | Published: January 13, 2024 08:04 PM2024-01-13T20:04:55+5:302024-01-13T20:06:32+5:30
पुष्षक कॉलनी येथील रहिवाशी हवालदार नंदकिशोर उर्फ नाना गर्गे हे पोलीस सेवेत नव्याने दाखल झालेल्या जवानांना प्रशिक्षण देत होते
अमरावती: शहर पोलीस मुख्यालयात ड्रिल इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर गर्गे (५०) यांचा शनिवारी सकाळी हृद्यविकाराने ऑनड्युटी मृत्यू झाला. स्थानिक एसआरपीएफ आवारात पोलिसांना प्रशिक्षण देत असताना त्यांच्या छातीत कळ निघाली. त्यांना तातडीने सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
पुष्षक कॉलनी येथील रहिवाशी हवालदार नंदकिशोर उर्फ नाना गर्गे हे पोलीस सेवेत नव्याने दाखल झालेल्या जवानांना प्रशिक्षण देत होते. शनिवार १३ जानेवारी रोजी देखील ते पोलीस जवानांना फायरिंगचे प्रशिक्षण देण्यासाठी एसआरपीएफ कॅम्पस्थित मैदानावर गेले होते. तेथे प्रशिक्षणादरम्यान त्यांच्या छातीत कळ निघाली, त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना इसीजी काढण्याची सुचना केली. मात्र इसीजी काढण्यापुर्वी त्यांना तेथेच हुदयविकाराचा झटका आला. अन् त्यांची प्राणज्योत मालवली. शहर पोलीस आयुक्तालयातील कल्याण शाखेचे निरिक्षक पुंडलिक मेश्राम यांनी इर्विन गाठून पुढील प्रक्रिया पार पाडली.