दीड कोटींची पाणीपुरवठा योजना ठिकठिकाणी लिकेज ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 11:11 AM2024-09-14T11:11:27+5:302024-09-14T11:12:02+5:30
Amravati : जामली गावात फॉगिंग मशीनने फवारणी; परिस्थिती आटोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील जामली आर येथे उद्भवलेली अतिसारची लागण आटोक्यात आली आहे. गावात दीड कोटी रुपयांतून झालेली पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरल्याने दूषित पाण्याने तिघांचा बळी घेणारी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. फॉगिंग मशीनने फवारणी करण्यासह टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
चिखलदरा तालुक्यातील जामली आर या गावात तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अतिसारची लागण झाल्याने दीडशेपेक्षा अधिक आदिवासींची तपासणी करण्यात आली. येथील जिल्हा परिषद शाळेत दाखल २४ रुग्णांची प्रकृती आटोक्यात असून आरोग्य यंत्रणा तैनात ठेवण्यात आली आहे. अतिसाराची लागण झाल्याने तिघांचा मृत्यू ओढावल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून त्यांच्या मृत्यूला पाणीपुरवठ्याचे निकृष्ट काम जबाबदार असल्याचे उपसरपंच विनायक येवले यांनी आरोप केला तसेच संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. मेळघाटात आरोग्य यंत्रणेचा कारभार पूर्णतः ढेपाळला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात ना डॉक्टर, ना परिचारिका अशी स्थिती असताना आदिवासींनी उपचार कसा व कोठे घ्यावा, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे.
गावात फॉगिंगने धूरळणी
ताप व इतर आजारांची लक्षणे वाढू नये, यासाठी गावात फॉगिंग मशीनने धूरळणी करण्यात आली. टँकरने पाणीपुरवठा केल्या जात आहे. मेळघाटात एकंदर आतापर्यंत दहा गावात अतिसाराची लागण होऊन शेकडो रुग्ण आजारी पडले. जिल्हा प्रशासनाची कागदोपत्री ढिसाळ कार्यवाही सुरू असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीपुरवठ्यात शिरले गटाराचे पाणी?
जामली आर गावात दीड कोटी रुपये खर्चुन पाणीपुरवठा करणारी योजना तयार करण्यात आली परंतु, या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पाणीपुरवठा करणारे पाईप ठिकठिकाणी फुटले व त्यातूनच गटाराचे पाणी शिरल्याने नळातून अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला. त्यामुळे अतिसाराची लागण होऊन तिघांचा मृत्यू झाला.
जामलीत डेंग्यूचे पाच, चिकुनगुनियाचे तीन रुग्ण
अतिसाची लागण असलेल्या जामली आर गावात रक्तनमुने तपासणीअंती डेंग्यूचे पाच आणि चिकनगुनियाचे तीन रुग्ण आढळले. त्यामुळे आता नवीन संकट या गावावर ओढवले असून आरोग्य यंत्रणेची जबाबदारी वाढली आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपायोजना करण्याची मागणी होत आहे
"जामली आर गावातील स्थिती नियंत्रणात जामलीआर गावात परिस्थिती नियंत्रणात आहे. पाणीपुरवठा योजनेचे निकृष्ट काम गावात अतिसाराची लागण होण्यास कारणीभूत ठरली आहे. ठिकठिकाणी पाईपलाईनला गळती आहे. संबंधित अधिकारी-कंत्राटदारांवर कारवाई करण्यात यावी."
- विनायक येवले, उपसरपंच, जामली आर