दीड एकरातील मिरचीने दिले पावणेतीन लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:22 AM2021-02-18T04:22:00+5:302021-02-18T04:22:00+5:30
राजुरा बाजार : हिरव्या मिरचीची बाजारपेठ म्हणून राजुरा जिल्ह्यात प्रसिद्ध असले तरी मध्यंतरी भाव पडल्याने शेतक०यांचे अतोनात नुकसान झाले. ...
राजुरा बाजार : हिरव्या मिरचीची बाजारपेठ म्हणून राजुरा जिल्ह्यात प्रसिद्ध असले तरी मध्यंतरी भाव पडल्याने शेतक०यांचे अतोनात नुकसान झाले. त्यातूनही मार्ग काढत वरूड तालुक्यातील काटी येथील युवा शेतक०याने हिरवी मिरची वाळवून नागपूर येथे चौपट भावाने विकली. दीड एकराचील मिरचीने या युवकाला पावणेतीन लाख रुपये मिळवून दिले.
महेंद्र भड असे पदवीधर युवकाचे नाव आहे. लॉकडाऊनमध्ये जून महिन्यात त्याने मिरचीची दोन एकरात लागवड केली. वडील, भावासमवेत कष्ट घेतले. लॉकडाऊनपश्चात सुरुवातीला बरे भाव मिळाले. नंतर मात्र नोव्हेंबर महिन्यापर्यंत अडीच महिने दर खाली गेले. मजुरीचाही खर्च निघत नव्हता. त्यामुळे दीड एकरातील हिरवी मिरची वाळविण्याचा निर्णय घेतला. त्यातून निघालेली २४ क्विंटल मिरची १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने त्याने कळमना येथे बाजार समितीत विकली. याशिवाय त्यापूर्वी १७५ क्विंटल हिरवी मिरची २५०० रुपये दराने विकली गेली तसेच १५० वाफ्यांच्या नर्सरीतून रोपविक्री केली. घरचे सर्व शेतीत राबल्याने मजुरीत बचत झाली. मात्र, बी-बियाने रासायनिक खते, कीटकनाशके यात खर्च बराचसा आल्याने नफ्यात घट झाली.
------------
शेतीत कसल्याशिवाय यश येत नाही. राजुरा येथे कोल्ड स्टोरेजची तातडीने उभारणी व्हावी. म्हणजे मार्केटचा तोल पाहून माल विक्री करता येईल.
- महेंद्र भड,मिरची उत्पादक, काटी, ता. वरूड