दीड तास चालला जीवन-मरणाचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 10:28 PM2018-09-02T22:28:42+5:302018-09-02T22:29:09+5:30
गुरे चारत असताना एका धिप्पाड अस्वलीने पाठीमागून हल्ला चढविला. खचून न जाता घाबरता त्याने प्रत्युत्तर दिले. परंतु, अस्वलीच्या धारदार नखाने त्याला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी सुटका करून तो झाडावर चढला. अस्वली व तिची पिलं त्याच्या उतरण्याची वाट पाहू लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : गुरे चारत असताना एका धिप्पाड अस्वलीने पाठीमागून हल्ला चढविला. खचून न जाता घाबरता त्याने प्रत्युत्तर दिले. परंतु, अस्वलीच्या धारदार नखाने त्याला गंभीर जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत कशीबशी सुटका करून तो झाडावर चढला. अस्वली व तिची पिलं त्याच्या उतरण्याची वाट पाहू लागले.
जीवन-मरणाचा खेळ दीड तास तालुक्यातील खोंगडा जंगलात शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास रंगला. नारायण तुकाराम येवले (३०, रा. टेंब्रुसोंडा) असे जखमी गुराखी युवकाचे नाव आहे. तो खोंगडा येथे दुधाळ जनावरे घेऊन आहे. शनिवारी सकाळी गावापासून एक किलोमीटर अंतरावरील पूर्व मेळघाट वनविभाग अंजनगाव परिक्षेत्र अंतर्गत जंगलात तो गुरे घेऊन गेला होता. अचानक त्याच्यावर अस्वलीने हल्ला केला. डोक्याला, पाठीला, पायाला चावा घेऊन जखमी केले. झाडाखालून अस्वल निघून गेल्यानंतर नारायण गावात आला. नागरिकांनी तात्काळ टेंब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. प्रकृती गंभीर असल्यामुळे परतवाडा येथील खासगी दवाखान्यात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
पिलांसाठी चवताळली अस्वल
मेळघाटच्या जंगलात वाघापेक्षा स्थानिक रहिवाशांना अस्वलाची सर्वाधिक भीती आहे. एकट्या अस्वलापेक्षा पिलं सोबत असलेली अस्वली माणसावर तात्काळ हल्ला करते. गुरांनी प्रतिकार करीत सैरावैरा पळत हंबरडा फोडला, तर नारायण जीव वाचविण्यासाठी झाडावर चढून आश्रय घेतला.
खोंगडा जंगलात असल्याने जखमी केलेल्या नारायण येवले यांच्यावर उपचार करण्यात आले. पुढील उपचारार्थ परतवाडा येथे पाठविण्यात आले.
- सोहन मरस्कोल्हे
वैद्यकीय अधिकारी, टेम्ब्रुसोंडा