दीड लाखांचा चालान घोटाळा; प्राचार्यांवर ठपका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:21 PM2018-07-23T23:21:08+5:302018-07-23T23:21:29+5:30
चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात दीड लाखांचे चालान घोटाळ्याप्रकरणी प्राचार्य दोषी असल्याचा अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना चौकशी समितीने सादर केला आहे. त्यामुळे प्राचार्य नीळकंठ भुसारी यांचेविरूद्ध कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात दीड लाखांचे चालान घोटाळ्याप्रकरणी प्राचार्य दोषी असल्याचा अहवाल कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना चौकशी समितीने सादर केला आहे. त्यामुळे प्राचार्य नीळकंठ भुसारी यांचेविरूद्ध कोणत्या स्वरूपाची कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील मोताडा येथील रमेश मंडळकर यांनी चिखली येथील शिवाजी महाविद्यालयाने दीड लाखांचे बोगस चालान जोडून विद्यापीठाची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार नोंदविली होती. त्याअनुषंगाने कुलगुरू चांदेकर यांनी चालान घोटाळाप्रकरणी राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यंवशी यांचे अध्यक्षेत चौकशी समिती नेमली होती. या समितीने कुलगुरूंकडे चौकशी अहवाल सादर केला आहे. विद्यापीठाकडून माजी विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जाचे नियमन करण्यासाठी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी ४० रूपये अतिरिक्त दिले जाते. ही रक्कम परीक्षा अर्ज स्वीकारणाºया कर्मचाºयांना मिळणे अपेक्षित असते. मात्र, यातील प्रति अर्ज २० रूपयांची रक्कम ही प्राचार्य भुसारी हे आपल्याकडे ठेवत असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. प्राचार्य भुसारी यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज परीक्षेच्या तारखेपर्यंत महाविद्यालयाच्या कपाटात ठेवल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. परीक्षेच्या दोन दिवसांअगोदर प्रवेश पत्र घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ही बाब लक्षात आली. तसेच त्याअगोदर विद्यापीठात जमा करण्यात आलेल्या परीक्षा अर्जांबरोबर स्टेट बँकेचा शिक्का व स्वाक्षरी असलेले बोगस चालान जोडण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात चालान जोडलेल्या तारखेत ती रक्कम विद्यापीठाच्या खात्यावर जमाच झालेली नव्हती. त्यामुळे याप्रकरणी प्राचार्य भुसारी हे दोषी आढळले असून, त्यांचेवर कोणत्या स्वरूपाची कारवाई प्रस्तावित होते, याकडे विद्यापीठ वर्तुळाचा नजरा लागल्या आहेत.
यापूर्वी शिवाजी शिक्षण संस्थेने प्राचार्य नीळकंठ भुसारी यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे. मात्र, आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी आता गंभीर स्वरूपाची कारवाई करणे अपेक्षित आहे.
चिखली येथील शिवाजी महाविद्यालयात चालान घोटाळाप्रकरणी चौकशी अहवाल रविवारी प्राप्त झाला आहे. या अहवालात नेमके काय आहे, हे तपासले जाईल. त्यानंतरच कोणत्या स्वरूपाची कारवाई प्रस्तावित असावी, हे स्पष्ट होईल.
- मुरलीधर चांदेकर,
कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
गत आठवड्यात प्राचार्य भुसारी यांच्यासंदर्भात चौकशी अहवाल कुलगुरुंकडे सादर केला आहे. यात आर्थिक अनियमितता झाली असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. विद्यापीठाने चौकशी अहवाल शिवाजी शिक्षण पाठवावा असे कळविले आहे.
- दिनेश सूर्यवंशी,
सदस्य, व्यवस्थापन परिषद अमरावती विद्यापीठ