अट्टल चोरट्याकडून एक दुचाकी जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: November 6, 2023 03:18 PM2023-11-06T15:18:47+5:302023-11-06T15:19:27+5:30
आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
अमरावती : एका अट्टल दुचाकी चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेने रविवार, ५ नोव्हेंबर रोजी अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी जप्त करण्यात आली. चोरट्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्याची कसून चौकशी सुरू आहे.
आशिष ओंकारराव आपकाजे (२०) रा. शनिवार पेठ, वरूड असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आशिष हा कागदपत्रे नसलेली दुचाकी क्रमांक एमएच २७ बीसी ५२५५ ही विक्रीसाठी वरूड येथे ग्राहक शोधत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारावर पथकाने आशिषला पारडी बोरांग परिसरातून ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीत त्याने सदर दुचाकी ही साथीदारासह वरूड येथील शनिवार पेठ परिसरातून चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याला अटक करून दुचाकी जप्त करण्यात आली.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, मोहम्मद तस्लीम शेख गफूर व मुलचंद भांबुरकर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदाने, बळवंत दाभणे, रवींद्र बावणे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पंकज फाटे, संजय गेठे यांनी केली.