पिकांच्या कुंपणासाठी एक कोटीचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:21 PM2019-01-22T22:21:58+5:302019-01-22T22:22:25+5:30
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी कुंपणाकरिता जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात एक कोटी रूपयांची तरतूद करण्याचा ठराव २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या कृषी विषय समितीच्या सभेत पारीत करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे पिकांच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना पीक संरक्षणासाठी कुंपणाकरिता जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात एक कोटी रूपयांची तरतूद करण्याचा ठराव २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या कृषी विषय समितीच्या सभेत पारीत करण्यात आला.
जिल्हा परिषद कृषी विषय समितीची सभा विविध विषयांना अनुसरून उपाध्यक्ष तथा कृषी समिती सभापती दत्ता ढोमणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेत समिती सदस्य प्रवीण तायडे, प्रकाश साबळे आदींनी कुंपणासाठी अनुदानाचा मुद्दा उपस्थित केला. सन २०१९-२० मधील जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये शेतकºयांच्या कृषिपिकांचे वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान लक्षात घेता, शेतीपिकांच्या संरक्षणासाठी अनुदान देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यामुळे सभापती दत्ता ढोमणे यांनी शेती कुंपणास तार पुरविण्याकरिता आगामी बजेटमध्ये एक कोटी रुपयांची तरतूद करण्यास मंजुरी दिली. याशिवाय सौरऊर्जेवर आधारित कृषिपंप संच पुरविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदानापोटी ५० लाख रुपयांच्या तुरतूदीचा ठरावही या सभेत मंजूर करण्यात आला.
सभेत कृषी विभागामार्फत सन २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून मंजूर तरतूदीनुसार खर्चाचा आढावा, डीबीटीद्वारे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत अनुदानावर वितरित साहित्य वाटपाचा पंचायत समितीनिहाय लेखाजोखा समितीचे पदाधिकाऱ्यांनी कृषी विभागाकडून घेतला. यावेळी इतरही मुद्द्यांवर कृषी समितीत सदस्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
सभेला सदस्य प्रताप अभ्यंकर यांच्यासह कृषी विभागाचे राऊत, उईके यांच्यासह महाबीजचे अधिकारी उपस्थित होते.