एक दिवसाआड बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:19 PM2018-12-26T22:19:03+5:302018-12-26T22:19:56+5:30
जिल्हा स्त्री रुग्णालयात एक दिवसाआड एक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वर्षअखेर आकडेवारीवरून उघड होत आहे. ३६० दिवसांत २३५ बाळांचे मृत्यू झाले असून, ६ मातामृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षातील मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत २७१ बालमृत्यू झाले होते, तर ६ माता मृत्यू झाले होते. त्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयात एक दिवसाआड एक बालमृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वर्षअखेर आकडेवारीवरून उघड होत आहे. ३६० दिवसांत २३५ बाळांचे मृत्यू झाले असून, ६ मातामृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षातील मार्च २०१७ ते एप्रिल २०१८ पर्यंत २७१ बालमृत्यू झाले होते, तर ६ माता मृत्यू झाले होते. त्या तुलनेत यंदा बालमृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळून येत आहे.
जिल्ह्यासह परराज्यातील गोरगरिब महिलांच्या प्रसूती उपचाराचा डोलारा सांभाळणाऱ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात दरवर्षी ५० हजारांवर रुग्णांचे उपचार केले जाते. एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत डफरीन रुग्णालयात ओपीडी कक्षात २५,२२० रुग्ण उपचारासाठी आले होते. १८,०६९ महिला रुग्णांना दाखल करण्यात आले. यामध्ये ६,२५२ महिलांचे नॉर्मल प्रसूती झाली. ३,६०० महिलांचे सिझेरीयन करण्यात आले. ५,४३१ मुले, तर ५,२४१ मुलींचा जन्म झाला आहे. यामध्ये मुलींची संख्या १९० ने कमीच असल्याचे दिसून येत आहे. या वर्षातील जानेवारी महिन्यात २७ बाळांचे मृत्यू झाले. फेब्रुवारीत २२, मार्च १५, एप्रिल १८, मे १९, जून ३१, जुलैत १७ बाळांचे, तर तीन मातामृत्यू, आॅगस्टमध्ये १७ बाळ व एक माता मृत्यू, सप्टेंबरमध्ये २६ बाळांचे मृत्यू, आॅक्टोबरमध्ये १९, तर नोव्हेंबरमध्ये १८ बाळांचे मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
यामुळे होतात मृत्यू
ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या महिलांना गंभीर स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले जाते. मात्र, उपचारासाठी आणताना विलंब होत असल्यामुळे महिलांचे किंवा बाळांचे मृत्यू होतात. याशिवाय कमी वजनाचे बाळ, वेळेपूर्वी जन्मलेल्या बाळांचे अधिक मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.
डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप
डफरीनमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या महिलांचे किंवा बाळांचे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक डॉक्टरांवर हलगर्जीपणांचे आरोप करतात. अनेकदा पोलिसांत तक्रारीसुद्धा झाल्या आहेत. मात्र, आजपर्यंत या आरोपात कोणतेही तत्थे उघड झाली नाहीत.
१ हजार २८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ दरम्यान जिल्हा स्त्री रुग्णालयात १ हजार २८ महिलांवर कुटुंब नियोजनांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गेल्या वर्षातील एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ पर्यंत १ हजार ५१० महिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या.