शासकीय रुग्णालयात खासगी डॉक्टरांची एक दिवस सेवा; प्रवीण पोटे पाटील यांचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 03:37 PM2023-06-28T15:37:33+5:302023-06-28T15:38:11+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने लवकरच होणार खासगी डॉक्टरांची बैठक
अमरावती : येथील ईर्वीन, डफरीन या शासकीय रुग्णालयात उद्भवलेली आरोग्य समस्या, प्रश्नावर मात करण्यासाठी ३६५ दिवसांपैकी एक दिवस खासगी डॉक्टरांची सेवा आरोग्य यंत्रणेने घ्यावी, असे कळकळीचे आवाहन आमदार प्रवीण पोेटे पाटील यांनी मंगळवारी आढावा बैठकीत केले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडे प्रस्ताव मांडला. परिणामी येत्या काही दिवसांतच जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आरोग्य यंत्रणेमार्फत खासगी डॉक्टरांची बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.
उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेत विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. या वेळी आमदार प्रवीण पोटे पाटील हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दरम्यान, आमदार पोटे पाटील यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर बोट ठेवले. मनुष्यबळाचा तुटवडा ही समस्या एकट्या अमरावतीच नव्हे तर राज्यभरात आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात गरीब, सामान्य कुटुंबातील व्यक्तींना चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा मिळावी, हे आपले उत्तरदायित्व आहे. डॉक्टर्स हे रुग्णांसाठी साक्षात देव ठरतात. त्यांची रुग्णसेवा ही पैशात मोजता येत नाही. डॉक्टर्सदेखील समाजाचे काही देणं लागतात. त्यामुळे ‘खासगी डॉक्टरांची एक दिवस सेवा शासकीय रुग्णालयात’ या उपक्रमाची अमरावतीत मुहूर्तमेढ रोवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेने पुढाकार घ्यावा. पुढे हा उपक्रम राज्यातच नव्हे तर देशात राबविला जाईल, असा आशावाद आमदार प्रवीण पोटे पाटील यांंनी व्यक्त केला. लगेच या उपक्रमाला जिल्हाधिकारी कौर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांना शहरातील खासगी डॉक्टरांची त्या अनुषंगाने बैठक घेण्याची सूचना केली.
या आढावा बैठकीत महावितरणचे ट्रान्सफार्मर, वीज खांब स्थलांतरण, घरावरील वीजवाहिनी हटविणे, सबस्टेशन निर्मिती यासह कृषी, पीकविमा, बी-बियाणांचा काळाबाजार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या जलवहिनी, भूमिअभिलेख पीआर कार्ड आणि पट्टा वाटप, महापालिका निगडीत स्वच्छता, नालेसफाई आदी प्रश्न, समस्यांवर आमदार प्रवीण पोटे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या वेळी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तक्रारी येता कामा नये, लोकांची कामे वेळेत करा, असे निर्देशित केले.