मेळघाटात भूमकानंतर मध्य प्रदेशातील बोगस डॉक्टरच्या उपचाराने एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:20+5:302021-04-29T04:10:20+5:30
कॅप्शन - खंडूखेडा येथे मध्यप्रदेशचा बोगस डॉक्टर बेले उपचार करताना कोरोनाच्या नावावर आदिवासी पाड्यात धूम, तालुका प्रशासनासह बैतूल जिल्हाधिकाऱ्यांकडे ...
कॅप्शन - खंडूखेडा येथे मध्यप्रदेशचा बोगस डॉक्टर बेले उपचार करताना
कोरोनाच्या नावावर आदिवासी पाड्यात धूम, तालुका प्रशासनासह बैतूल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे - चिखलदरा ( अमरावती) : मध्य प्रदेश सीमारेषेवर वसलेल्या मेळघाटात कोरोनाच्या नावावर बोगस डॉक्टरने उपचार केला. त्यात खंडुखेडा येथील एका आदिवासीचा मृत्यू झाला. काटकुंभ आरोग्य केंद्रातील पथक उपचाराकरिता गेले तेव्हा सोमवारी सायंकाळी त्या बोगस डॉक्टरने गावातून धूम ठोकली. यासंदर्भात तालुका प्रशासनासह बैतुल (मध्यप्रदेश) जिल्हाधिकार्यांना तक्रार करण्यात आली आहे. गत आठवड्यात सेमाडोह येथील एका कोरोनाग्रस्त महिलेचा भूमकाच्या उपचाराने मृत्यू झाला. त्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली आहे.
मध्यप्रदेशच्या खामला (ता. भैसदेही) येथील राहुल बेले असे बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्या उपचाराने खंडुखेडा येथील सावजी काल्या चिमोटे (५०) या इसमाचा मृत्यू झाला. बोगस डॉक्टरने त्याच्यावर जुजबी उपचार केले. मात्र, प्रकृती खूपजास्त खालावल्याने भैसदेही येथे पाठवून दिले. त्यात त्याचा मृत्यू झाला. मेळघाटातील काटकुंभ, चुरणी, हतरू, जारिदासह जवळपास ४० खेडी मध्यप्रदेशच्या बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्याच्या सीमारेषेवर आहेत. त्यामुळे आदिवासींचे सर्वाधिक व्यवहार मध्य प्रदेशात होतात. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न खंडुखेडा येथे रविवारी कोविड लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील, डॉ. मनोज जाणे, रोशन आठवले, आरोग्य कर्मचारी झाकर्डे, तायडे, आशा, अंगणवाडी सेविका असे पथक गेले होते. मात्र, कोणीच येत नसल्याचे पाहून हे पथक घरोघरी गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेक घरांत सलाईन टांगलेल्या होत्या, तर रुग्ण बिछान्यावर होते. बोगस डॉक्टर राहुल बेले एका घरात बसलेला दिसला. पथकाने विचारपूस केली असता, तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पथकाने त्याला पिटाळून लावण्यात आले.
बॉक्स
बैतूल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
वैद्यकीय नियमानुसार, एका राज्यातील डॉक्टर दुसऱ्या राज्यात येऊन एकदम उपचार करू शकत नाही. परंतु, बोगस डॉक्टरच्या या उपचार पद्धतीने एकाचा मृत्यू झाला. त्या संदर्भातील तक्रार काटकुंभचे वैद्यकीय अधिकारी आदित्य पाटील व आरोग्य समन्वयक रोशन आठवले यांनी बैतुल जिल्हाधिकारी, भैसदेही उपविभागीय अधिकारी व चिखलदरा तहसीलदार तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना केली.
बॉक्स
खंडुखेड्यात १७ पॉझिटिव्ह रुग्ण
मेळघाटातील आदिवासी पाड्यांमध्ये झपाट्याने कोरोनाची लागण होत आहे. काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण ७८ कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यापैकी डोमा येथे १८ व खंडुखेड्यात १७ रुग्ण आहेत.
कोट
खंडुखेडा येथे मध्य प्रदेशच्या खामला येथील बोगस डॉक्टर उपचार करताना आढळून आला. त्याने उपचार केलेल्यांपैकी एका इसमाचा मृत्यू झाला. त्याच्याकडे कुठलेच प्रमाणपत्र नव्हते. त्यासंदर्भातील तक्रार तालुका प्रशासन व बैतूल जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
- आदित्य पाटील, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, काटकुंभ