एक हेक्टर जमिनित स्ट्रॉबेरी, गहू, फुलकोबी; उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 06:00 AM2020-12-15T06:00:00+5:302020-12-15T06:00:02+5:30
मोथा गावातील उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने एका हेक्टरमध्ये स्ट्रॉबेरी, गहू, कोबी, लसूण, वांगी, टमाटर, मिरची अशी विविध पिके घेत मेळघाटातील इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईमुळे पाण्यासाठी नागरिकांची वणवण असताना, टँकरग्रस्त असे विशेषण लागले असताना, त्याच मोथा गावातील उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने एका हेक्टरमध्ये स्ट्रॉबेरी, गहू, कोबी, लसूण, वांगी, टमाटर, मिरची अशी विविध पिके घेत मेळघाटातील इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
गजानन शनवारे असे या युवा शेतकऱ्याचे नाव. वडिलोपार्जित शेतजमिनीत पारंपरिक पिकांना फाटा देत सहा वर्षांपासून ते नवनवीन प्रयोग करीत आहेत. मेळघाटसारख्या भागात लाल माती व खडकाळ जमिनीत मुबालक पाणी नसताना, कमी पाण्यात जास्त पिके घेण्याचा केलेला प्रयोग यशस्वी ठरू लागला आहे. स्वत: शेतात राबून गजानन शनवारे या उत्पादनावर कुटुंबाचे पालनपोषण करीत आहेत.
दुष्काळग्रस्त गावात ठिबक
चिखलदरापासून अवघ्या सहा किलोमीटर, परतवाडा मार्गावरील मोथा गावाला स्मार्ट ग्राम म्हणूनसुद्धा पुरस्कार मिळाला. गावात तलाव, विहीर असली तरी उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होतो. टँकरने पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत गजानन शनवारे यांनी शेतातील विहिरीच्या भरवशावर स्प्रिंकलरचा वापर व ठिंबक सिंचनाद्वारे शेतात नवनवीन प्रयोग केले आहेत.
१ लाखात ३ लाखांचे उत्पन्न
उच्चशिक्षित गजानन शनवारे यांनी शासकीय नोकरीसाठी काही वर्षे प्रयत्न केले. मात्र, यश मिळाले नाही. त्यामुळे घरच्या एक हेक्टर जमिनीवर विविध प्रयोग करण्याचे ठरविले. कृषिमित्र म्हणून त्यांची निवड झाली. पाणी फाउंडेशनसह शिवाजी कृषी शाखेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात विविध ठिकाणी जाऊन त्यांनी शेतात प्रयोग करण्यास सुरुवात केली. स्ट्रॉबेरी ते मिरची रोपासाठी त्यांनी एक लाख रुपये खर्च केले. त्यातून त्यांना ३ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.