शंभर टक्के नुकसान झाले तरी पीक विमा अप्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:41+5:302021-09-25T04:12:41+5:30
अंजनगाव सुर्जी : गतवर्षीचा सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकाचा विमा मिळण्याबाबत अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने ...
अंजनगाव सुर्जी : गतवर्षीचा सोयाबीन, कपाशी व संत्रा पिकाचा विमा मिळण्याबाबत अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने दिली. परंतु दखल न घेतल्यामुळे संघटनेने नाईलाजास्तव रास्ता रोको आंदोलन केले. त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर कृषी कार्यालयाला घेराव व टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान सभास्थळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना, विमा देण्यासंदर्भात सरकारी निकष आडवे येत असल्याने अपली असमर्थता व्यक्त केली. शेतकरी संघटनेने याच विषयासंबंधात ६ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन दिले होते. पण, अद्याप सकारात्मक कारवाई केलेली नाही.
शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान होऊनसुद्धा पीक विमा मिळाला नाही. याबाबतीत पालकमंत्री, जिल्हाधिकारी व कृषी आयुक्तांसोबत चर्चा घडवून आणावी, अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले होते. २३ सप्टेंबर रोजी याचसंदर्भात तहसीलदारांना स्मरणपत्र देण्यात आले. सनदशीर मार्गाने न्याय्य मागणीसाठी आंदोलन करूनही न्याय मिळत नाही. शेतीची कामे लक्षात घेता न्याय्य हक्कासाठी शेतकऱ्यांवर वारंवार आंदोलनाची वेळ येत असल्याने शासकीय यंत्रणेचा हलगर्जीपणा यातून स्पष्ट होते. विमा कंपन्यांशी साटेलोटे करून कंपनीचा गल्ला भरण्यास सरकारी व शासकीय यंत्रणा काम करते की, काय असा संशय शेतकऱ्यांना येत आहे.
संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घडवून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित देण्यात यावी, अन्यथा शेतकरी संघटना बेमुदत आंदोलन करेल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे तहसीलदारांना स्मरणपत्रात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, तालुकाध्यक्ष संजय हाडोळे, स्वभाप तालुकाध्यक्ष गजानन दुधाट, माणिकराव मोरे, सुनील पाटील साबळे, अशोक गीते, देवीदास ढोक, मनोहर रेचे, सुरेश महाराज मानकर शास्त्री, संजय हिंगे, अरुण गोंडचोर, ओम प्रकाश मुरतकर, ज्ञानेश्वर वानखडे, गणेशराव चिंचोळकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.