आलाडोह गावात शंभर टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:09 AM2021-06-27T04:09:39+5:302021-06-27T04:09:39+5:30
चुरणी : मेळघाटात कोविड लसीकरणाबाबत औदासीन्य असताना चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा या छोट्याशा गावात शंभर टक्के लसीकरण झाले आहे. या ...
चुरणी : मेळघाटात कोविड लसीकरणाबाबत औदासीन्य असताना चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा या छोट्याशा गावात शंभर टक्के लसीकरण झाले आहे. या गावाचा आदर्श घेत मोथा उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून जनजागृती आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वनमाला जयंत खडके यांच्या पुढाकाराने आलाडोह गावात आजारी व्यक्ती वगळता शंभर टक्के लसीकरण झाले. मेळघाटातील शंभर टक्के लसीकरण झालेले हे पाचवे गाव ठरले आहे.
मेळघाटात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले. ती लाट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने गावागावांत लसीकरणाला सुरुवात केली. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, ज्यामुळे रुग्ण कमी झाले आहेत. मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा जोमाने लसीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र, मेळघाटातील बहुतेक गावांतील नागरिक लस घेण्यास इच्छुक नाहीत.
चिखलदरा तालुक्यातील चिंचखेडा गावातील नागरिकांनी शंभर टक्के लसीकरण करून घेतले होते. त्यानंतर या गावाचा आदर्श घेत इतर तीन गावांमध्ये ४५ वर्षांवरील पात्र सर्वांनीच लसीकरण करून घेतले. तसाच आदर्श आता आलाडोह येथील गावकऱ्यांनी घेतला आहे, ज्यामुळे आलाडोह गावाचासुद्धा शंभर टक्के लसीकरणाच्या यादीत समावेश झाला आहे.
लसीकरण यशस्वी करण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य वनमाला जयंत खडके यांच्यासह मोथा उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता नागले, आरोग्यसेवक दिनेश बैगणे, आरोग्य सेविका हिना सौदागर, प्रवीणा धाकडे, अंगणवाडी सेविका सुमित्रा अकोटकर, आशा सेविका पुष्पा गायन, लसीकरण सनियंत्रक राहुल चावरे, ग्रामपंचायत कर्मचारी आकाश खडके, युवक काँग्रेसचे कार्यकर्ता संतोष गायन यांनी परिश्रम घेतले.
**मेळघाटात कोरोना लसीकरणा बाबत गैरसमज पाहायला मिळत आहे मात्र प्रशासनाच्या मदतीने गैरसमज दूर करण्यासाठी काम सुरू आहे आलाडोह येथील नागरिकांनी पुढाकार घेतला ज्यामुळे शंभर टक्के लसीकरण होण्यास यश मिळाले या गावासारखा पुढाकार मेळघाटच्या इतर गावातील नागरिकांनी घेतला तर मेळघाटचे इतर गावही शंभर टक्के लसीकरण झालेले पाहायला मिळेल :-डॉ नीता नागले वैद्यकीय अधिकारी मोथा