तालुक्यात एक लाख ७६ हजारांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:55+5:30
तालुक्यात शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गुटखा, सागवान, अवैध दारूची खुलेआम विक्री केली जाते. मात्र, पोलीस प्रशासनातर्फे आजवर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. अखेर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या टीमने धाड टाकून कारवाई केली. यामुळे चांदूर बाजार व शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : संचारबंदीदरम्यान शहरासह देऊरवाडा येथे अवैध गुटख्याची तस्करी सुरू असल्याच्या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने दोन ठिकाणी धाड टाकून एक लाख ७६ हजारांचा सुगंधित गुटखा जप्त केला. गुरुवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
परतवाडा मार्गावरील समीर मलिये यांच्या घरात प्रतिबंधित तंबाखू व गुटखा आसल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली. तेथून ८० हजारांचा, तर शिरजगाव कसबा ठाण्यांतर्गत देऊरवाडा येथे धाड टाकून ९६ हजारांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांच्या मार्गदर्शनात पीआय अजय आखरे, वसीम खान, मोहसीन पठाण, अर्जुन पडिला, प्रतीक्षा मेटरे, किरण बांबल, भूषण पेठे, वीरेंद्र अमृतकर यांनी केली. अजय आखरे यांनी चांदूर येथून जप्त केलेला गुटखा पुढील कार्यवाहीसाठी चांदूर बाजार ठाण्याकडे, तर देऊरवाडा येथे जप्त केलेला गुटखा शिरजगाव पोलिसांच्या स्वाधीन केला.
स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह