तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या गैरवाजवी कृतीमुळे शासनाला एक लाखांचा भुर्दंड!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2021 11:22 PM2021-01-31T23:22:21+5:302021-01-31T23:22:46+5:30
Amaravati :सीआरपीसी कलम १६० चे उल्लंघन पोलीस आयुक्तांनी केल्याबाबत कुलदीप गावंडे व कांचनमाला गावंडे यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क अधिकार आयोग,मुंबई याच्यांकडे ७९१/२०११-१२ अन्वये याचिका दाखल केली होती.
अमरावती : दर्यापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कुलदीप पाटील गावंडे यांना एका प्रकरणात सन २०१०-११ मध्ये अटक झाली होती. त्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेशकुमार व शहर कोतवालीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी कुलदीप गावंडे यांच्या पत्नी कांचनमाला गावंडे व दोन मुली (रा.मांगीलाल प्लॉट, अमरावती) यांना कोणतही लेखी समन्स न देता चौकशीसाठी सूर्यास्तानंतर पोलीस आयुक्त कार्यालय येथे बोलावले होते. या कृतीसाठी राज्य मानवी हक्क आयोगाने शासनाला एक लाखांचा दंड २०१७ साली ठोठावला. त्याप्रकरणी २९ जानेवारी २०२१ रोजी याचिकाकर्त्यांना एक लाखाचा धनादेश प्राप्त झाला आहे.
सीआरपीसी कलम १६० चे उल्लंघन पोलीस आयुक्तांनी केल्याबाबत कुलदीप गावंडे व कांचनमाला गावंडे यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क अधिकार आयोग,मुंबई याच्यांकडे ७९१/२०११-१२ अन्वये याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर राज्य मानवी अधिकार आयोगाने ५ एप्रिल २०१७ रोजी अंतिम सुनावणी घेऊन तक्रारदार कुलदीप गावंडे यांच्या पत्नी कांचनमाला गावंडे व दोन मुली (रा. अमरावती) यांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये साडेबारा टक्के व्याजासह द्यावे असे, शासनाला आदेशित केले होते.
वरील आदेशाच्या अनुषंगाने १४ ऑक्टोबर २०२० च्या शासननिर्णयानुसार २९ जानेवारी २०२१ रोजी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयातून कुलदीप गावंडे यांच्या मुलीने दंडाच्या रकमेचा एक लाखाचा धनादेश स्वीकारला. मात्र, २५ एप्रिल २०१७ ते २९ जानेवारी २०२१ या कालावधीत साडेबारा टक्के व्याजाची रक्कम अद्यापही अप्राप्त आहे. ते मिळण्यासाठी किती वेळ थांबावे लागेल, हे सांगता येत नाही, असे कुलदीप गावंडे यांनी सांगितले.