एक लाख मजूर आधार लिंकिंगच्या प्रतीक्षेत
By admin | Published: January 17, 2015 10:50 PM2015-01-17T22:50:45+5:302015-01-17T22:50:45+5:30
रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने मजुरांचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी मजुरांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक केले जात आहे.
अमरावती : रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने मजुरांचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. त्यासाठी मजुरांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक केले जात आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या कामाची अद्याप केवळ ४८.५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. आधार नंबरच्या नोंदी घेण्यात आल्या असल्या तरी त्या बँकेकडून व्हेरीफाय न झाल्यामुळे तब्बल १ लाख ११ हजार ५५१ हून अधिक मजूर लिंकिंगच्या प्रताक्षेत ताटकळत आहेत.
आतापर्यंत केवळ १ लाख ५० हजार ४८ एवढ्या मजुरांचेच आधार बँक खात्याशी लिंक झाले आहेत. त्यामुळे या मजुरांचे पैसे त्यांच्या खात्यावर थेट जमा होऊ शकतात. रोजगार हमी योजनेतील गैरप्रकार कमी करण्यात येऊन मजुरांना त्याची रोजंदारी वेळेत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मजुरांचे वेतन थेट बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. यासाठी सरकारने आदेश दिल्याप्रमाणे कामकाज केले जात आहे. आधार बेस्ट पेमेंटची कारवाई जिल्ह्यात सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेकडे नोंद असलेल्या २ लाख ९७ हजार ५३ मजुरांचे आधार क्रमांक खात्यांना लिंक केले जाणार आहेत. या मोहिमेत आतापर्यंत एमआयएस सिस्टीमवर १ लाख ५० हजार ४८ मजुरांचे आधार कार्ड 'अपलोड' करण्यात आले आहेत. त्यातील आजमितीस १ लाख ११ हजार ५५१ मजूर कार्यरत आहेत. त्यांचे बँकेमार्फत व्हेरीफिकेशन झालेले नाही. त्यामुळे त्यांचे आधार नंबर बँक खात्याशी लिंक झालेले नाहीत. या मजुरांचे नंबर लिंक झाल्याशिवाय त्यांच्या खात्यावर वेतन जमा करता येणे शक्य होणार नाही. या कामात अमरावती जिल्हा पाहिजे तसा पुढे नसून माघारला जात असल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)