छोरियानगरात तीन घरफोड्यांत एक लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:12 AM2021-04-13T04:12:08+5:302021-04-13T04:12:08+5:30
कौस्तुभ विनोद पुरुषे (२२), सचिन विनायक चौधरी (३८) आणि श्यामकुमार केशवराव गुल्हाने (३८, तिन्ही रा. छोरियानगर) यांच्या घरी कुणी ...
कौस्तुभ विनोद पुरुषे (२२), सचिन विनायक चौधरी (३८) आणि श्यामकुमार केशवराव गुल्हाने (३८, तिन्ही रा. छोरियानगर) यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी हात साफ केला. पुरुषे यांच्या घरातून ८४,५००, चौधरी यांच्या घरातून २४,००० आणि गुल्हाने यांच्या घरातून तीन हजार रुपये असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला. या घटनेमुळे शहरात नागरिकांमध्ये चोरांची दहशत निर्माण झाली आहे.
------------
जुगार अड्ड्यावर धाड
शेंदूरजनाघाट : स्थानिक पोलिसांनी १० एप्रिल रोजी तिवसाघाट येथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून ८७२० रुपये जप्त केले. रामेश्वर गणोरकर, रोशन गणोरकर, आशिष गणोरकर, अश्विनी गणोरकर, रूपेश डहाके, अक्षय माकोडे, आशिष माकोडे, नितेश खेरडे, केशव सावरकर विरुद्ध भादंविचे कलम ३५३, ३४, १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
-------------
क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीने वार
धारणी : शेतातील माकडे हाकलत असताना बॅटरीचा उजेड जागल करणाऱ्या दोघांच्या चेहऱ्यावर पडल्याने त्यांनी शिवीगाळ केली तसेच कुऱ्हाडीने डाव्या पायावर वार करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रेशा शिवारात ११ एप्रिल रोजी घडली. राजकुमार मंगल भिलावेकर यांच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी प्रल्हाद लखन सरनमे आणि त्याच्या मुलाविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------------
चाकूच्या धाकावर २५ हजार लुटले
चिखलदरा : अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून चाकूच्या धाकावर खिशातून २५,८०० रुपये हिसकले. ही घटना ग्राम बियाणी ते घटांग रस्त्यावर शनिवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. किशोर हिराजी बेलसरे (३४, रा. सलोना) यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदविला.
--------------------
बांधलेल्या घरावर ट्रॅक्टर फिरविला
चिखलदरा : तालुक्यातील सोमवारखेडा येथे ११ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या जागेवर बांधलेल्या घरावर ट्रॅक्टर फिरविण्यात आला. संजय राजू काळे यांच्या तक्रारीवरून चिखलदरा पोलिसांनी किशोर अमरू काळे, देवान अमरू काळे, लक्ष्मण मोहन काळे, गोपाल मोहन काळे, पंडित किसन काळे, दादू किसन काळे, अमरू किसन काळे (सर्व रा. सोमवारखेडा) विरुद्ध भादंविचे कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ५०४, ५०६, ४२७ अन्वये गुन्हा नोंदविला.
------------