Amravati: एकतर्फी प्रेमातिरेक; ‘ती’ च्या घरासमोर घेतला विषाचा घोट, वारंवार पाठलाग
By प्रदीप भाकरे | Published: October 1, 2023 01:55 PM2023-10-01T13:55:11+5:302023-10-01T13:56:08+5:30
Amravati: एकतर्फी प्रेमातिरेकामधून एका तरूणाने कथित प्रेयसीच्या घरासमोर जाऊन विषाचा घोट घेण्याचा प्रयत्न केला.
- प्रदीप भाकरे
अमरावती - एकतर्फी प्रेमातिरेकामधून एका तरूणाने कथित प्रेयसीच्या घरासमोर जाऊन विषाचा घोट घेण्याचा प्रयत्न केला. तथा प्रेयसीला फसविण्याची धमकी दिली. १ एप्रिलापासून ते ३० सप्टेंबरपर्यंत दररोज तो तिचा पाठलाग करत असून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याने अखेर तिने फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी याप्रकरणी, पिडित तरूणीच्या तक्रारीवरून ३० सप्टेंबर रोजी आरोपी लोकेश धाडवे (२३, रा. रहाटगाव) याच्याविरूध्द धमकी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एका मेडीकल स्टोअरमध्ये सोबत काम करत होते. तेव्हा आरोपी हा तरूणीसोबत व्यवस्थित राहायचा. परंतू गतवर्षी एप्रिलमध्ये लोकेशने मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे, मला तू खुप आवडतेस, असे तिला प्रपोज केले. मात्र तिने त्याला नकार दिला. काही दिवसांनी तरूणीने त्या मेडिकल शॉपीमधील काम सोडले. दरम्यान यंदाच्या एप्रिलमध्ये आरोपी हा फिर्यादी तरूणीच्या घराजवळ आला. मी तुला सोडणार नाही, अशी धमकी तिला दिली. तेव्हापासून त्याने तिचा वारंवार पाठलाग चालविला. तिच्या घरासमोर तो चकरा मारायला लागला. एप्रिलनंतर एक दिवस तर त्याने तिच्या घराजवळ येऊन विष पिण्याचा प्रयत्न केला. तथा तिला पोलीस कारवाईत फसविण्याची धमकी दिली.
तर तुला बदनाम करेन
३० सप्टेंबर रोजी दुपारी १२ च्या सुमारास पिडित तरूणी घरी असताना आरोपी लोकेश धाडवे तिच्या घरासमोर पोहोचला. तिच्या घरासमोर जात तू माझ्यासोबत लग्न केले नाहीस, तर मी तुला बदनाम करेन, अशी गर्भित धमकी दिली. त्याच्या या माथेफिरू वागण्यामुळे तिच्यासह तिच्या कुटुंबिय देखील भयभीत झालेत. त्यामुळे शनिवारी रात्रीच्या सुमारास तिने पालकांसह फ्रेजरपुरा पोलीस ठाणे गाठले. तो आपल्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो, वारंवार पाठलाग करत असल्याची तक्रार तिने नोंदविली.