धक्कादायक... अमरावती जिल्हा परिषदेच्या माडीझडप शाळेत एक विद्यार्थी अन् दोन शिक्षक
By गणेश वासनिक | Published: March 3, 2024 05:40 PM2024-03-03T17:40:52+5:302024-03-03T17:42:04+5:30
मेळघाटच्या आदिवासी भागातील भीषण वास्तव; ४०० लोकसंख्या असलेले गाव विकास, पायाभूत सुविधांपासून वंचित
गणेश वासनिक, अमरावती: थोरपुरुष, समाजसुधारकांनी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे निक्षून सांगितले आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी बऱ्यापैकी तरतूद आहे. तरी देखील राज्याच्या ग्रामीण भागातील शाळांचे चित्र फारसे समाधानकारक नाही.असाच काहीसा प्रकार अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दुर्गभ भागातील जिल्हा परिषदेच्या माडीझडप शाळेत एक विद्यार्थी अन् दोन शिक्षक निदर्शनास आला आहे.
चिखलदरा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलले माडीझडप हे गाव ४०० लोकसंख्येचे आहे. बहुल आदिवासी हे गाव असून, रोजगाराअभावी आदिवासी कुंटुबीय स्थलांतर करीत असल्याचे वास्तव आहे. या स्थलांतरणाचा फटका त्यांच्या मुला-बाळांना बसत असल्याचे दिसून येते. माडीझडप येथील शाळा ही अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आवागड या केंद्राशी जोडलेली आहे. ईयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत या शाळेत वर्ग असून, दोन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी एक शिक्षक माडीझडप या गावात मुक्कामी राहतात. तर एक शिक्षक ये-जा करीत असल्याची माहिती आहे. चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषदेची सर्वात कमी तीन विद्यार्थी पटसंख्या असलेली माडीझडप शाळेची नोंद आहे. मात्र,अन्य शाळांमध्ये किमान १० ते १५ विद्यार्थी पटसंख्या आहे.
माडीझडप शाळेत तीन विद्यार्थी आहेत. पहिली ते पाचवीपर्यत वर्ग असून, काही दिवसांपूर्वी पालकांनी दोन विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत पाठविले होते. मात्र आता ते दोन विद्यार्थी पुन्हा शाळेत परतले आहेत. सध्या तीन विद्यार्थी, दोन शिक्षण अशी या शाळेची रचना आहेत. - रामेश्वर माळवे, खंडविकास अधिकारी, चिखलदरा.