कांद्याचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:41 PM2017-10-24T23:41:46+5:302017-10-24T23:41:57+5:30
हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : हल्ली बाजारपेठेत ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दराने कांदे विकले जात आहेत. गत आठवड्यात झालेल्या पावसाने कांदा उत्पादनाला फटका बसला आहे. जुन्या कांद्याची आवक सप्टेंबरअखेर मंदावली, तर नव्या उत्पादनाचे कांदे खराब झाले आहेत. त्यामुळे २० दिवसातच दर दुप्पट झाला आहे.
शेतकºयांनी उन्हाळ्यात कांद्याचे उत्पादन घेतले तेव्हा मे २०१७ मध्ये शेतकºयांच्या कांद्याला बाजारात ५ ते ६ रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. आता पाच महिन्यांनंतर शेतकºयांचा कांदा बंद होताच आॅक्टोबरमध्ये ४० ते ४५ रुपये प्रतिकिलो दर आहे. आॅगस्टपर्यंत १० ते १५ रुपये तर सप्टेंबर महिन्यात २० रुपये किलो दराने कांदा विकला गेला, अशी माहिती कांदा विक्रेते किशोर खारकर यांनी दिली. जिल्ह्यात परतवाडा, अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अंजनगाव बारी, चांदूरबाजार या भागात प्रामुख्याने कांद्याचे उत्पादन घेतले जाते. पावसाळी कांदा ऐन कापणीवर आला असताना परतीच्या पावसाने तो सडला. परिणामी बाजारपेठत त्याला भाव मिळत नाहीे. पावसाने फटका बसलेला कांदा बाजारपेठेत आणल्यानंतर वाहतुकीचा खर्च निघत नाही, अशी विदारक स्थिती आहे.
उन्हाळी कांद्याचे उत्पादन सप्टेंबरमध्येच संपुष्टात आले. आॅक्टोबर महिन्यात नवा कांदा आल्यानंतर थोडाफार भावात दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते. परंतु परतीच्या पावसाने कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान केले आहे. बाजार समितीत लासलगाव, कोल्हापूर, नाशिकसह गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून कांदा विक्रीसाठी मागविला जात आहे. लालसगावचा लाल रंगाचा कांदा असून, ठोक भाव ३८०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल आहे. कांद्याची आवक कमी झाल्यास पुढील दोन महिन्यात कांदा ८० ते १०० रुपये प्रतिकिलो दरावर पोहोचेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.२
गुजरात, कर्नाटकातील कांद्यावर भिस्त
परतीच्या पावसाने राज्यात कांद्याचे उत्पादन कमालीचे घटले आहे. बाजारपेठेत मागणीनुसार कांदा येत नसल्याने भाववाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे येत्या काळात राज्याला कर्नाटक, गुजरात येथून कांदा मागवावा लागेल. काही प्रमाणात उत्तरप्रदेशातूनही कांदा विक्रीसाठी आणला जाईल, अशी माहिती आहे.
पावसाळी कांदा उत्पादनातून अधिक आर्थिक लाभ मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, परतीच्या अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान केले आहे. कांदा खराब झाला असून, त्याला बाजारपेठेत भाव नाहीे. कांदा काढणीचा खर्चदेखील निघणे कठीण आहे.
- सुनील शेरेवार,
कांदा उत्पादक, बङनेरा
जुना कांदा बाजारेपेठेत येणे जवळपास बंद झाला आहे. पावसाळी कांद्याचे उत्पादन घटले असून, अवकाळी पावसाने यात भर घातली आहे. हीच परिस्थिती कायम असल्यास येत्या दोन महिन्यांत ६० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विकला जाईल.
- सतीश कावरे,
कांदा व्यापारी, बाजार समिती