रस्त्यावर फेकले कांदे अन् ओतले दूध
By admin | Published: June 3, 2017 12:03 AM2017-06-03T00:03:32+5:302017-06-03T00:03:32+5:30
शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत प्रहारने शुक्रवारी सकाळी परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाका ....
दोन तास वाहतूक ठप्प : प्रहार शेतकरी संघटनचे आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत प्रहारने शुक्रवारी सकाळी परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाका येथे प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाचा निषेध व्यक्त करीत रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रॉलीने कांदा फेकून दूध ओतण्यात आले. या आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प पडली होती.
शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘नरेंद्र मोदी किसान विरोधी’, जय जवान जय किसानचा नारा देत प्रहार शेतकरी संघटनेने सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. यावेळी प्रहारचे दीपक भोरे, बल्लू जवंजाळ, संजय तट्टे, दीपक धुळधर, मंगेश हुड, गजानन भोरे, राजा तट्टे, महेश सुरंजे, बंडू ठाकरे, राजू पाटील, साहेबराव मेहरे, रवींद्र भोरे यांच्यासह प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांना कुठल्याच प्रकारची माहिती न देता ‘प्रहार’ने शुक्रवारी आंदोलनाचा पावित्रा घेतला. आंदोलनाची गोपनीय माहिती मिळताच परतवाडा, अचलपूर, वाहतूक विभागासह अतिरिक्त पोलीस कुमक तैनात केली होती.
संपाला ‘लढा’चा पाठिंबा :
तिवसा : १ जूनपासून संपावर गेलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत लढा संघटनेने शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध नोंदविला. पेट्रोल पंपजवळ रस्त्यावर दूध ओतून भाजीपाला, कांदे, भेंडी फेकून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. आंदोलनानंतर तिवसा तहसीलदार राम लंके यांना लढा संघटनेचे अध्यक्ष संजय देशमुख यांच्या नेतृत्वात दिले.
प्रहारने दिल्या नकली नोटा :
धामणगाव रेल्वे : राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाला ‘प्रहार’ने पाठिंबा दर्शवित दोन तास आंदोलन करून तूर खरेदी केल्यानंतर दोन महिन्यांपासून चुकारा न दिल्याने प्रहारने नकली नोटा देऊन अभिनव आंदोलन केले़ गांधी चौक येथून तहसील कार्यालयावर हेंडवे यांच्या नेतृत्वात मोर्चा नेला. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाने लक्ष न दिल्यास जिल्ह्यात आंदोलनाचा इशारा जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे यांनी दिला़ यावेळी प्रहारचे तेजस धुर्वे, अमर काकडे, विशाल सावरकर, राहुल चांभारे, प्रफुल्ल डाफ, प्रवीण रोहनकर, संदीप कावरे, दिनेश निचत, मंगेश माळोदे, सरफराज पठाण उपस्थित होते