आयपीएलवर ऑनलाईन सट्टा; चार सट्टेबाज अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: April 6, 2023 04:22 PM2023-04-06T16:22:16+5:302023-04-06T16:23:14+5:30
सीपींच्या विशेष पथकाची कामगिरी : म्होरक्यांचा शोध
अमरावती : इंडियन प्रिमियर लीग ‘आयपीएल’वर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या चार सट्टेबाजांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. ५ एप्रिल रोजी रात्री दोन ठिकाणी ही यशस्वी कार्यवाही करण्यात आली. आरोपींकडून एकुण नऊ मोबाईल जप्त करण्यात आले. पंजाब किंग विरूद्ध राजस्थान रॉयल्स या मॅचवर तो सट्टा खेळविला जात होता.
आयपीएलच्या अनुषंगाने शहरात मोठया प्रमाणात खेळल्या जाणा-या सट्टयावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने विशेष पथक गठीत करण्यात आले आहे. दरम्यान पंजाब किंग विरूध्द राजस्थान रॉयल्स या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनच्या सहाय्याने बेटिंग घेऊन हारजीतचा खेळ खेळला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्या माहितीनुसार, पथकप्रमुख पोलीस उपनिरिक्षक गजानन राजमलू यांनी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतूल अंबिकानगर भागातील चवरे मार्केटजवळ कार्यवाही करून तीन सट्टेबाजांना अटक केली. त्यांच्याकडून १.६१ लाख रुपये किमतीचे आठ मोबाईल जप्त करण्यात आले.
आरोपींमध्ये नितेश वेदप्रकाश बजाज (२९, रा. कंवरनगर), विपुल राजेश हसवानी (२९, दातेराव मैदानाजवळ, राजापेठ), राहुल विनोद साहू (३७, रा. इतवारा बाजार, मस्जीत रोड, अमरावती) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूध्द फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले.
रिंगरोडवरून एक सट्टेबाज ताब्यात
सायबर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र इंगळे यांच्या पथकाने गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील रिंग रोड जवळ कार्यवाही केली. तेथून राहुुल भिकनराव मुकुंद (४०, रा. कठोरा रोड, पिंगळाई अपार्टमेन्ट अमरावती) याला ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरूध्द गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे.