समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांगकरिता ऑनलाईन शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:04+5:302020-12-06T04:13:04+5:30
अमरावती : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा समाजकल्याण कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाकरिता ऑनलाईन ...
अमरावती : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा समाजकल्याण कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगाकरिता ऑनलाईन शिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या विषयतज्ञ शिक्षक मार्गदर्शन करणार असून, त्यांना येणाऱ्या समस्यांचे ऑनलाईन पद्धतीने निराकरण केले जाणार आहे. ऑनलाईन शिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ ३ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती दयाराम काळे यांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग शाळा बंद आहेत. तसेच कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेता दिव्यांगांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिव्यांग मुलांनाही ऑनलाईन शिक्षण घेणे सोयीचे जावे याकरिता जिल्हा समाजकल्याण कार्यालय जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाईन लाईव्ह शिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन शिक्षणाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात या ऑनलाईन शिक्षणाला प्रारंभ झाला आहे. यावेळी कार्यक्रमाला समाजकल्याण सभापती दयाराम काळे, समाजकल्याण अधिकारी दीपा हेरोडे, शालेय समिती अध्यक्ष नरेंद्र दाभाडे, समिती सदस्य सचिव जितेंद्र ढोले पुरुषोत्तम शिंदे, शिरिषकुमार मोहपात्रा, नवनाथ इंगोले, गजानन गोस्वामी, महेंद्र शिंदे, नीरज तिवारी आदींसह इतर अधिकारी, कर्मचारी तसेच दिव्यांग विद्यार्थी व पालक ऑनलाईन उपस्थित होते.