‘ट्रायबल’मध्ये लिपिकांना पदोन्नतीसाठी ऑनलाइन परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 07:57 PM2019-05-15T19:57:21+5:302019-05-15T19:57:36+5:30
आयुक्तांचा निर्णय : अर्हताकारी, सेवा प्रवेशोत्तरांचा समावेश
अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने लिपिकांना पदोन्नतीसाठी ऑनलाइन परीक्षा अनिवार्य केली आहे. यात अर्हताकारी आणि सेवा प्रवेशोत्तरांचा समावेश आहे. नागपूर, ठाणे, अमरावती व नाशिक अपर आयुक्त कार्यालयांतर्गत २९ एकात्मिक प्रकल्प कार्यालयांच्या अधिनस्थ लिपिकांची ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.
‘ट्रायबल’च्या शासकीय आश्रमशाळा, निवासी शाळा, वसतिगृह, एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि अपर आयुक्त कार्यालयातील वर्ग ३ कर्मचाऱ्यांची बहुआयामी ऑनलाइन पद्धतीने सेवा प्रवेशोत्तर, अर्हताकारी विभागीय परीक्षेचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे तसेच परीक्षेच्या अनुषंगाने कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्याची तयारी चालविली आहे. नाशिक येथील आयुक्त कार्यालयातून ऑनलाइन परीक्षा नियोजनाचा निर्णय झाला आहे. लिपिकांना ऑनलाइन परीक्षेविषयी माहिती देण्यासाठी स्वतंत्र प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
परीक्षा नियमानुसार परीक्षार्थी कर्मचाऱ्यांना विषयनिहाय परीक्षा अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकाबाबत तपशीलवार प्रशिक्षण दिले जाणार आहे. विषयनिहाय तज्ज्ञ मार्गदर्शकामार्फत परीक्षार्थींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षा आज्ञावलीचे कामकाज सुरू असून, येत्या काही दिवसांत परीक्षा सरावासाठी कर्मचाऱ्यांना लिंक उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयातील सहायक प्रकल्प अधिकारी संध्या पवार यांनी पत्राद्वारे कळविले. नाशिक २५०, ठाणे २२५, अमरावती १८०, तर नागपूर एटीसी अंतर्गत १२५ लिपिक ऑनलाइन परीक्षा देतील, अशी आकडेवारी आयुक्तांकडे पाठविली आहे.
अमरावतीत प्रशिक्षण आटोपले
लिपिकांना पदोन्नतीसाठी आवश्यक असलेल्या ऑनलाइन परीक्षेबाबत ८, ९ व १० मे रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रशासकीय अकादमी (प्रबोधिनी) येथे तीन दिवस तज्ज्ञांकडून परीक्षार्थ्यांना विषयनिहाय मार्गदर्शन करण्यात आले आहे. सुमारे १५० लिपिकांनी या प्रशिक्षणास हजेरी नोंदविली होती.
लिपीकांची पदोन्नतीकरिता पहिल्यांदाच ऑनलाइन परीक्षा घेण्यात येत आहे. यात नवीन कर्मचाºयांना विभागीय परीक्षा देता येणार आहे. प्रशिक्षण आटोपले असून, आता ऑनलाइन परीक्षेच्या तारखेची प्रतीक्षा आहे.
- नितीन तायडे
उपायुक्त, अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास विभाग अमरावती.