ऑनलाईन फसवणूक; इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड बदलण्याच्या नादात ३.२५ लाखांचा गंडा
By प्रदीप भाकरे | Published: August 9, 2023 04:51 PM2023-08-09T16:51:21+5:302023-08-09T16:52:37+5:30
मोबाईल युजरविरूद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल
अमरावती : येथील एका ५० वर्षीय प्राध्यापकाला एसबीआयच्या इंटरनेट बॅंकिंगचा पासवर्ड बदलण्याची प्रक्रिया तब्बल ३ लाख २५ हजार १७ रुपयांमध्ये पडली. ८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान त्यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी, नितीन वानखडे (५०, रा. अप्पू कॉलनी, शेगाव रोड, अमरावती) यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी मंगळवारी एका मोबाईल युजरविरूद्ध फसवणूक व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला.
नितीन वानखडे यांना एसबीआय इंटरनेट बँकींगचा पासवर्ड बदलावयाचा होता. त्यासाठी त्यांनी ८ ऑगस्ट रोजी एका सर्च इंजिनवर एसबीआय ऑनलाईन सर्च केले. त्यावर युझर पासवर्ड टाकून इंटरनेट बँकिंग पासवर्ड बदलविण्याकरीता प्रक्रिया केली. मात्र ती प्रक्रिया पुर्ण झाली नाही. त्यानंतर त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून एक लिंक प्राप्त झाली. त्यावर वानखडे यांनी क्लिक केले असता योनो एसबीआय नावाचे वेबपेज उघडले. त्यावर युझर आयडी आणि पासवर्ड टाकून दिलेली प्रक्रिया पुर्ण केली असता लगेच त्याच वेबपेजवर ओटीपी येणे सुरु झाले.
प्रक्रियेदरम्यान ते ओटीपी त्या वेबपेजवर टाकले असता अज्ञात इसमाने त्यांच्या एसबीआय अकाऊंटमधून टप्याटप्याने तीन वेळा एकुण ३ लाख २५ हजार रुपये डेबिट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वानखडे यांनी लागलीच सायबर पोलीस ठाणे गाठले. तथा तक्रार नोंदविली. सायबर पोलिसांनी देखील तत्क्षणी गुन्हा दाखल केला.