केकने तोंड केले कडू, महिलेला हजारोंचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 01:41 PM2021-11-09T13:41:33+5:302021-11-09T14:10:48+5:30
ऑनलाइन केक ऑर्डर करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेला क्युआर कोड स्कॅन करताच महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले.
अमरावती :ऑनलाइन केक ऑर्डर करणे, एका महिलेला तब्बल ३९ हजार ९२६ रुपयांमध्ये पडले. स्थानिक न्यू प्रभात कॉलनी येथे १ ऑगस्ट रोजी सायंकाळी अवघ्या एका तासात ही फसवणूक करण्यात आली.
ऑनलाइन शॉपिंग करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, त्यासोबतच सायबर गुन्हेगारीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. असाच एक प्रकार अमरावतीत उघडकीस आला असून ऑनलाइन केक ऑर्डर करून रक्कम रिफंड करण्यासाठी पाठवलेल्या क्यूआर कोडच्या माध्यमातून महिलेची हजारोंनी फसवणूक झाली आहे.
न्यू प्रभात कॉलनीमधील रहिवासी महिलेने केक ऑर्डर करण्यासाठी गुगलवर सर्च केले. गुगलवर मिळालेल्या एका मोबाईल क्रमांकावर त्यांनी कॉल लावला, तर पलिकडून केकची ऑर्डर करण्यासाठी व रक्कम रिफंड करण्यासाठी क्युआर कोड पाठविण्यात येऊन तो स्कॅन करण्यास सांगितले गेले. तो स्कॅन केला असता त्या महिलेच्या खात्यातून टप्प्याटप्प्याने ३९ हजार ९२६ रुपये कपात झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी ८ नोव्हेंबर रोजी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी ९५४७१७९६८१ या मोबाईलधारकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.