जिल्ह्यात ऑनलाइन जुगाराचे नेटवर्क जोमात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:12 AM2021-02-07T04:12:36+5:302021-02-07T04:12:36+5:30
पान ३ ची लिड सुमित हरकूट चांदूर बाजार : शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ऑनलाइन जुगाराचे पेव फुटले असून, ...
पान ३ ची लिड
सुमित हरकूट
चांदूर बाजार : शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ऑनलाइन जुगाराचे पेव फुटले असून, शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुण आणि नोकरदार मंडळीही मोठ्या प्रमाणात या ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेल्याचे दिसत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जुगारामध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या जुगाराच्या नादाला लागून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.
या ऑनलाइन जुगारामध्ये आजकल बिंगो, रमी, रेस, तीन पत्ती या प्रमुख चार प्रकारची चलती असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात ऑनलाइन जुगाराचे अनेक केंद्रे आहेत. त्यांच्या चालकांनी आपापल्या सोईनुसार या ऑनलाइन जुगाराचे अॅप्स विकसित केले आहेत. ज्याला कुणाला यापैकी कोणताही जुगार खेळायचा असेल त्याला सर्वात आधी त्या जुगार सेंटरचे अधिकृत सभासद व्हावे लागते. त्यानंतर काही ठरावीक डाऊन पेमेंट संबंधित जुगार खेळविणाऱ्याकडे जमा करावे लागते. सभासद झाल्यानंतर संबंधिताच्या मोबाइलवर हवे असेल ते किंवा सगळ्या प्रकारच्या ऑनलाइन जुगाराचे अॅप डाऊनलोड केले जाते. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आपल्या मोबाइलच्या माध्यमातून घरबसल्या कोणत्याही वेळी आणि किती रकमेचा जुगार खेळता येतो.
जुगारासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप
ज्यांच्याकडे स्मार्टफोनची सुविधा नसेल किंवा जो सभासद नसेल त्यांना थेट जुगार अड्ड्यावर जाऊन संबंधित जुगारचालकाच्या मोबाइलवर किंवा संगणकावर जुगार खेळण्याची सोय केली जाते. अशी चर्चासुद्धा शहरात जोर धरत आहे. तर अशा प्रकारच्या ऑनलाइन जुगार खेळणाऱ्याचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांना दररोजच्या जुगारामधील घडामोडी आणि चढ-उतार शेअर केले जातात. यात ग्रामीण भागात ऑनलाइन जुगार खेळणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
असा आहे ऑनलाइन जुगार
बिंगो या जुगारामध्ये कसिनोप्रमाणे फिरते चक्र असते. चक्रासोबत फिरणारी गोळी ज्या आकड्यावर स्थिरावेल तो आकडा लागला असे समजायचे. रमी आणि तीन पत्तीचा डाव हा पत्त्यातील डावाप्रमाणेच असून, रेस हा जुगारसुद्धा घोड्याच्या रेसवरचा आधारित आहे. कोणी कधी जुगार खेळला, किती रकमेचा खेळला त्याच्या सगळ्या नोंदी संबंधित जुगार अड्डा संचालकाच्या संगणकावर ऑनलाइन होतात. यापैकी जवळपास सगळे जुगार दहा रुपयांपासून सुरू होतात. जिंकणाऱ्याला लावलेल्या रकमेच्या दहापट रक्कम मिळते. मात्र यामध्ये जिंकणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी ही दिसत नाही.
संपूर्ण व्यवहार कॅशलेस
या ऑनलाइन जुगाराचे जवळपास सगळे व्यवहार ऑनलाइनच चालतात. सभासदाने भरलेले डाऊन पेमेंट संपले की पुन्हा भरणे, बक्षिसाची रक्कम ज्याच्या त्याच्या बँक खात्यावर वर्ग करणे आदी आर्थिक व्यवहार ऑनलाइन चालतात. हे जुगार अड्डे ऑनलाइन असल्यामुळे पोलिसांना याचा सुगावा लागत नाही. मात्र पोलिसांनी मनात आणले तर सहजासहजी त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.